चंदिगढ / वृत्तसंस्था
‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांची प्रकृती काही प्रमाणात खालावली असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱया पीजीआयएमईआर इस्पितळ प्रशासनाने दिली. मिल्खा यांना ताप आला असून त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली असल्याचे इस्पितळाने नमूद केले. दरम्यान, बुधवारी त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून यामुळे ते आयसीयूच्या बाहेर आहेत.
91 वर्षीय मिल्खा सिंग सध्या जनरल आयसीयूमध्ये असून तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. ‘गुरुवारी रात्री त्यांना अचानक ताप आला व ऑक्सिजन पातळीही खालावली. आजचा दिवस त्यांच्यासाठी फारसा चांगला नव्हता. पण, त्यांना आजारातून बाहेर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत’, असे त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.
मिल्खा यांना मागील महिन्यात कोरोनाची बाधा झाली होती. शिवाय, त्यांची पत्नी निर्मला कौर यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले. निर्मला कौर यांनी राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. मिल्खा यांना कोरोनावर मात केल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, मागील आठवडय़ात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना पुन्हा मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.
लिजेंडरी ऍथलिट मिल्खा सिंग चार वेळचे आशियाई सुवर्णजेते व 1958 राष्ट्रकुल चॅम्पियन आहेत. मात्र, 1960 रोम ऑलिम्पिक 400 मीटर्स फायनल इव्हेंटमध्ये चौथे स्थान संपादन केले, ही त्यांची कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरी ठरते. मिल्खा यांनी 1956 व 1964 ऑलिम्पिक प्रतिनिधीत्व देखील केले असून 1959 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.