ऑस्ट्रियाविरुद्ध 2-0 फरकाने एकतर्फी विजय, डेपी, डम्फ्रीजचा प्रत्येकी एक गोल
ऍमस्टरडम / वृत्तसंस्था
मेम्फिस डेपे व डेन्झेल डम्फ्रीज यांनी दोन्ही सत्रात प्रत्येकी 1 गोल नोंदवल्यानंतर युरो चषक फुटबॉल स्पर्धेत डच संघाने ऑस्ट्रियाचा 2-0 असा एकतर्फी फडशा पाडला आणि उपउपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान अगदी थाटात निश्चित केले. आजच्या सामन्यात आमच्या खेळाडूंनी अव्वल दर्जाचा खेळ साकारला. युक्रेनविरुद्ध लढतीपेक्षा येथे आम्ही अधिक सरस खेळाचे प्रदर्शन घडवले, असे नेदरलँड्स संघाचे प्रशिक्षक प्रँक डी बोएर म्हणाले. या स्पर्धेतील आपल्या सलामीच्या लढतीत नेदरलँड्सने युक्रेनचा 3-2 असा धुव्वा उडवला होता.
डेपेने पहिल्या सत्रात 11 व्या मिनिटाला पेनल्टी किकवर गोलजाळय़ाचा अचूक वेध घेत संघाला आघाडी मिळवून दिली. त्याचा हा 66 आंतरराष्ट्रीय सामन्यातील 27 वा गोल ठरला. त्यानंतर डम्फ्रीजने दुसऱया सत्रात 67 व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. डम्फ्रीजसाठी या स्पर्धेतील हा दुसरा वैयक्तिक गोल ठरला.
ऑस्ट्रियाचा कर्णधार डेव्हिड अलाबाच्या फाऊलमुळे नेदरलँड्स संघाला पेनल्टी बहाल केली गेली. मात्र, यासाठी रेफ्रींनी त्याचा ऑन स्क्रीन रिव्हय़ू पाहिला व त्यानंतरच पेनल्टी बहाल केली. नेदरलँड्सने या हंगामात केलेल्या पाचही गोलमध्ये डम्फ्रीजचे योगदान राहिले आहे. नेदरलँड्सचा संघ 7 वर्षांनंतर प्रथमच एखाद्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत असून येथे त्यांनी साखळी फेरीतील एक सामना बाकी असतानाच अंतिम 16 संघातील स्थान निश्चित केले आहे. या डच संघाला यापूर्वी 1998 मध्ये युरो चॅम्पियनशिप जिंकता आली असून 2014 मध्ये ब्राझिलियन भूमीत संपन्न विश्वचषक स्पर्धेत ते तिसऱया स्थानापर्यंत पोहोचू शकले होते.
धोंडशिरेच्या दुखापतीतून सावरलेल्या मॅथिज डे लिटच्या नेतृत्वाखालील भक्कम बचावामुळे ऑस्ट्रिया संघाला अगदी क्वचितही नेदरलँड्स संघाला भेदता आले नाही. अपवाद म्हणून 82 व्या मिनिटाला अलाबाने जोरदार आक्रमण केले. पण, हा हल्ला थोपवला गेला होता. या गटातील अन्य लढतीत युक्रेनने उत्तर मॅसेडोनियाला 2-1 असे नमवले असून येथे नेदरलँड्सने बाजी मारली असल्याने उत्तर मॅसेडोनियाचे आव्हान संपुष्टात आले आहे.
ऑस्ट्रियाचा संघ या लढतीत मार्को ऍरनॉटिकशिवाय खेळला. मार्कोला उत्तर मॅसेडोनियाच्या खेळाडूला पाडल्याबद्दल एका सामन्यातून बंदीची शिक्षा ठोठावली गेली. दरम्यान, डम्फ्रीजच्या आणखी एका गोलमुळे नेदरलँड्सच्या 4 डिफेंडर, 3 मिडफिल्डर्स व 3 फॉरवर्ड खेळवण्याची रणनीती आणखी फलद्रूप ठरली आहे. यापूर्वी या संघाची रणनीती 3 डिफेंडर, 5 मिडफिल्डर व 2 फॉरवर्ड अशी होती. डम्फ्रीज विंग बॅकवर खेळत प्रतिस्पर्ध्यांच्या पेनल्टी एरियामध्ये धडक मारु शकत असल्याने ही नेदरलँड्सची जमेची बाजू ठरली आहे.
क गटात आता नेदरलँड्सचा साखळी फेरीतील शेवटचा सामना उत्तर मॅसेडोनियाविरुद्ध रविवारी होणार असून ऑस्ट्रियाचा संघ युक्रेनविरुद्ध लढत देणार आहे. आम्ही आताही उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरु शकतो, असा आशावाद ऑस्ट्रियन प्रशिक्षक प्रँको यांनी व्यक्त केला आहे.









