राहुल नाईक मालिकावीर; प्रसाद नाकाडी सामनावीरचा मानकरी

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आक्रमक फलंदाजी व भेदक गोलंदाजीच्या जोरावर सिग्नेचर संघाने युनियन जिमखाना संघाचा अंतिम सामन्यात 30 धावांनी पराभव करून माळमारूती चॅम्पियन्स लीग चषक पटकाविला. राहुल नाईकला मालिकावीर, प्रसाद नाकाडीला सामनावीर पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
युनियन जिमखाना आयोजित माळमारूती चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिग्नेचर संघाने 20 षटकात 9 बाद 176 धावा केल्या. संतोष चव्हाणने 2 षटकार, 7 चौकारासह 55, सुरज तलवारने 1 षटकार, 3 चौकारासह 32, प्रसाद नाकाडीने 1 षटकार, 3 चौकारासह 31, मनोज पाटीलने 3 चौकार, 1 षटकारासह 28 धावा केल्या. जिमखानातर्फे संकेत देसाईने 38 धावात 4, मिलिंद चव्हाण व किरण तारळेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाचा डाव 18.5 षटकात सर्व बाद 146 धावात आटोपला. रोहित देसाईने 3 षटकार, 6 चौकारासह 68, संकेत देसाईने 2 चौकारासह 18, मिलिंद चव्हाणने 4 चौकारासह 16 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे प्रसाद नाकाडीने 18 धावात 4, विनायक सिद्दलींगने 18 धावात 2, विशाल शुभूचेने 23 धावात 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे एच. एस. कोंगाली, चंद्रकांत बांडगी, प्रसन्ना सुंठणकर, सुनील सक्री, एन. बी. पाटील, इरन्ना कलमठ, संजय मोरे, संजय चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सिग्नेचर व उपविजेत्या युनियन जिमखाना संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर प्रसाद नाकाडी, इम्पॅक्ट खेळाडू संकेत देसाई, उत्कृष्ट फलंदाज संतोष चव्हाण, उत्कृष्ट गोलंदाज तेजस पवार, स्पर्धेत छाप सोडणारा खेळाडू मनोज पाटील, मालिकावीर राहुल नाईक यांना चषक व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परशराम पाटील, मिलिंद चव्हाण, सचिन साळुंके, अनिल गवी यांनी विशेष परिश्रम घेतले.









