प्रतिनिधी / बेळगाव
मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरूवारी महिलांनी मोठय़ा श्रध्देने लक्ष्मी पूजन करुन व्रताची सांगता केली. मार्गशीर्ष गुरूवारी लक्ष्मी पूजन केल्यास सुखसमृध्दी आणि आयुरारोग्य प्राप्त होते, अशी श्रध्दा आहे. त्यामुळे महिलावर्ग लक्ष्मीची पूजा करतो.
चौरंगावर धनधान्य देणाऱया लक्ष्मीच्या प्रतिमेची मांडणी करुन त्यासमोर पाच फळे, विडय़ाची पाने आणि कलश ठेवून पूजा केली. विविध फुलांनी देवीची आरासही करण्यात आली. शेवटचा गुरूवार असल्याने सायंकाळी पूजा करुन महिलांनी हळदी-कुंकूही दिले.
सौभाग्यवायन आणि केळीसह ओटी भरुन लक्ष्मी व्रताच्या पुस्तिकेचेही वाटप करण्यात आले. दरम्यान या पूजेच्या निमित्ताने फळफळावळांची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली. अर्थात फुले, हार आणि फळांचे दर नेहमीपेक्षा वाढले. सुखसमृध्दी बरोबरच कोणत्याही विषाणुचा यापुढे संसर्ग नको, अशी प्रार्थनाही पूजा झालेल्या प्रत्येक घरामध्ये करण्यात आली.
गुरूवारी फुलांचा दर गडगडला
मार्गशिर्ष महिना सुरू असल्याने फुले, फळे व इतर पुजेच्या साहित्यांचे दर वाढले होते. मात्र शेवटचा गुरूवारी सकाळपासूनच होलसेल मार्केटमध्ये काही साहित्यांचे दर उतरले आहेत. विशेष करुन गुलाब फुलांचा दर बुधवारी 300 रुपये होता. गुरूवारी हाच दर 150 वर येवून ठेपला. याचबरोबर शेवंतीचा दर बुधवारी 250 ते गुरूवारी 150, झेंडू 120 च्या आसपासून असणारा गुरूवारी मात्र 60 रुपयांवर घसरला होता.









