वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू एस. व्ही. सुनील याने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय हॉकीला निरोप दिला. तब्बल चौदा वर्षांच्या हॉकी कारकीर्दीनंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. 2014 साली आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघामध्ये सुनीलचा समावेश होता.
32 वषीय सुनील हा कर्नाटकातील रहिवासी असून त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय हॉकी कारकीर्दीमध्ये 264 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना 72 गोल नोंदविले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देणारे हॉकीपटू रुपिंदरपाल सिंग आणि बिरेंद्र लाक्रा यांनीही गुरुवारी निवृत्ती जाहीर केली. कर्नाटकातील कुर्ग जिल्हय़ामध्ये एस. व्ही. सुनीलचे वास्तव्य असून 2007 साली त्याने आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रामध्ये आपले पदार्पण केले. 2007 साली झालेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून जेतेपद पटकाविले होते. भारतीय हॉकी संघातील एस. व्ही. सुनील हा आक्रमक स्ट्रायकर म्हणून ओळखला जातो. त्याने 2012 आणि 2016 साली ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 2011 आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया भारतीय हॉकी संघामध्ये एस. व्ही. सुनीलचा समावेश होता. 2014 आणि 2018 आशियाई स्पर्धांमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक मिळविणाऱया भारतीय संघाचे प्रतिनिधित्व एस. व्ही. सुनीलने केले होते. 2016 आणि 2018 चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर सुनीलने भारतीय हॉकी संघाला ऐतिहासिक रौप्यपदक मिळवून दिले होते. लंडन आणि रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने आपला सहभाग दर्शविला होता.









