प्रतिनिधी/ खेड
दापोली मार्गावरील चिंचघर-बौध्दवाडी बस थांब्यानजीक शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास येथील पोलिसांनी गस्तीदरम्यान 700 किलो वजनाचे व 72 हजार 500 रुपये किंमतीचे गोमांस जप्त केले. या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असून वाहतुकीसाठी वापरलेले वाहनही हस्तगत केले आहे.
चंद्रशेखर किसनलाल तांबोळी (40, रा. गोवंडी शिवाजीनगर-मुंबई, मुळगाव अहमदनगर), मुजाहीद (संपूर्ण नांव माहित नाही. रा. मुंबई), चंद्या पालशेतकर व अन्य तिघांचा समावेश आहे. हे तिघेही मुंबईतील असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.
पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, पोलीस शिपाई येलकर व चालक कोटकर यांची गस्त सुरू असतानाच एमएच 03 डीसी 7340 या वाहनाची तपासणी केली असता संशयास्पद हालचालीवरून पोलिसांचा संशय बळावला. यावेळी कसून तपासणी करण्यात आली असता वाहनांमध्ये 700 किलो वजनाचे गोहत्या करून आणलेले 1 लाख 72 हजाराचे गोमांस आढळले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे यांनी तक्रार दाखल केली.









