प्रतिनिधी/ सातारा
प्राथमिक शिक्षक बँकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत शिक्षक समितीचे संचालक किरण यादव यांनी सभासदांचे माईक बंद केल्याचा आरोप करत गोंधळ घातला. चेअरमन राजेंद्र घोरपडे, व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे यांनी सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. चेअरमन घोरपडे यांनी बँकेला 2 कोटीचा फायदा झाल्याचे सांगितले. सत्ताधारी संचालकांनी ठराव मांडले त्यास अनुमोदन देत विषय मंजूर करण्यात आले. तर काही सभासदांनी विषयांना विरोध केला.
शिक्षक बँकेची 74 वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन चेअरमन राजेंद्र घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे, संचालक दत्तात्रय कोरडे, ज्ञानेश्वर कांबळे, राजेंद्र जाधव, निर्मला बसागडे, मोहन निकम यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
चेअरमन राजेंद्र घोरपडे यांनी माहिती देताना म्हणाले, कोरोनाच्या काळात बँकेच्या संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. व्याजदरात कपात करुन नफा मिळवला आहे. त्यामध्ये दिर्घ मुदत कर्ज, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन तारण कर्जाचा व्याजदर कमी करण्यात आलेला आहे. बँकेने या आर्थिक वर्षात चांगले काम केल्याने 2 कोटी लाभ झाला आहे. सभासदांची मुलांना परदेशात शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक कर्जाचा व्याजदर कमी केलेला आहे. आजारपणात पतीपत्नीला 1 कोटी 67 लाखाची अशी भरघोस मदत केली आहे. सभासदांच्या वारसांना 4 कोटी 31 लाख मदत केली आहे. कोरोना काळात अल्पदराने आता 53 कोटी कर्ज वाटप केले आहे. अल्पमुदत कर्ज 8 कोटी वाटप करण्यात आले आहे. बँकेने अनावश्यक खर्च केला नाही. बँक टिकली पाहिजे. यासाठी संचालक मंडळ कटीबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या काही दिवसात मोबाईल बँकींग, डिजीटल बँकीग करण्यासाठी संचालक मंडळ कटीबद्ध आहे. बँकेला 2020-21 मध्ये 6 कोटी ढोबळ नफा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
चौकट
समितीचे संचालक किरण यादव यांनी केला निषेध
विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, सभासदांचा आवाज दाबला गेला असून मनमानी कारभार सत्ताधाऱयांनी केला आहे. ही सभा संचालक मंडळाची आहे की सभासदांची आहे. प्रशासनाने सभासदांचे माईक बंद केले त्याबाबत त्यांचा निषेध व्यक्त करतो. त्या सभेच्या ठिकाणी माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.









