वृत्तसंस्था/ सेंट जॉन्स, अँटिग्वा
क्रिकेट वेस्ट इंडीजच्या महिला निवड समितीने पुढील महिन्यात होणाऱया महिलांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय विंडीज संघाची घोषणा केली. न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा 4 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत होणार आहे.
स्टेफनी टेलर या संघाचे नेतृत्व करणार असून ऑफस्पिनर अनिसा मोहम्मदकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. अनिसाची ही पाचवी विश्वचषक स्पर्धा असेल. या संघात पाच युवा खेळाडूंचा समावेश असून विश्वचषकात ते पहिल्यांदाच खेळणार आहेत. या खेळाडूंत स्पिनर करिश्मा रामहरक, वेगवान गोलंदाज आलिया ऍलीन, सीमर चेरी ऍन प्रेजर, अष्टपैलू चिनेली हेन्री, सलामीवीर रशादा विल्यम्स यांचा समावेश आहे. आयसीसीच्या मेडिकल प्रोटोकॉलनुसार पंधरा खेळाडूंशिवाय तीन राखीव खेळाडू संघासोबत जाणार असून त्यात केसिया शुल्ट्झ, मँडी मांगरू, जेनेलीया ग्लासगो यांचा समावेश आहे.
या संघाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपवली असून विश्वचषकाआधी त्यांना यात चांगली तयारी करता आली आहे. या मालिकेत काही खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले असून विश्वचषक स्पर्धेवेळी त्यांची कामगिरी आणखी उंचावणारी होईल, असे निवड समिती प्रमुख ऍन ब्राऊन जॉन म्हणाल्या जागतिक दर्जाची लेगस्पिनर ऍफी फ्लेचरच्या समावेशाने संघाची गोलंदाजी आणखी भक्कम बनली आहे, असेही त्या म्हणाल्या.
विश्वचषक स्पर्धेत विंडीज महिलांची सलामीची लढत यजमान न्यूझीलंडविरुद्ध 4 मार्च रोजी बे ओव्हल, टॉरँगा येथे होणार आहे तर साखळी फेरीतील सातवा व शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 24 मार्च रोजी बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन येथे होईल. या स्पर्धेतील उपांत्य लढतीचा एक सामना याच मैदानावर 30 मार्चला तर दुसरा उपांत्य सामना 31 मार्च रोजी ख्राईस्टचर्च येथे होईल.
विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला विंडीज महिला संघ ः स्टेफनी टेलर (कर्णधार), अनिसा मोहम्मद (उपकर्णधार), आलिया ऍलीन, शेमेन कँपबेल, शामिलिया कॉनेल, दियांद्रा डॉटिन, ऍफी फ्लेचर, चेरी ऍन पेजर, चिनेली हेन्री, कायसिया नाईट, हेली मॅथ्यूज, चेडीयन नेशन, करिश्मा रामहरक, शकीरा सेल्मन, रशादा विल्यम्स.









