वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये एकमेव कसोटी सामना पर्थच्या वाका मैदानावर 30 सप्टेंबरपासून आयोजित केला होता. या सामन्या गुलाबी रंगाचा चेंडू वापरण्यात येणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाची परिस्थिती पुन्हा बिकट होत असल्याने या कसोटी सामन्याच्या ठिकाणामध्ये बदल करण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे.
आता हा एकमेव कसोटी सामना पर्थ ऐवजी गोल्डकोस्ट येथील क्विन्सलँडच्या स्टेडियममध्ये होईल, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱयामध्ये भारताचे अन्य दोन सामने 22 आणि 24 सप्टेंबरला गोल्ड कोस्ट आणि नॉर्थ सिडनी ओव्हल येथे घेतले जाणार होते पण आता या सामन्यांच्या ठिकाणामध्ये बदल करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱयाला 19 सप्टेंबरपासून प्रारंभ होईल.









