प्रतिनिधी/ सातारा
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साताऱयातल्या मोरे कॉलनी परिसरात विद्युत रोषणाई करत असताना सुनील पवार यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. तेथील स्थानिकांनी वारंवार महावितरण कंपनीकडे मागणी केली होती. त्यानुसार महावितरण कंपनीने गेल्या दोन दिवसांपासून अंडरग्राऊंड वायरिंग करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे सुटकेचा निश्वास नागरिकांनी टाकला आहे.
सातारा शहरातील मोरे कॉलनी व चिमणपुरा पेठ या भागांना जोडणारी विद्युत वाहक तार ही इमारतीच्या अतिशय जवळून गेलेली आहे. त्याबाबत स्थानिकांनी अनेकदा महावितरण कंपनीकडे विनंती केली होती की त्यावर उपाययोजना करण्यात यावी. परंतु त्याकडे कटाक्षाने महावितरण कंपनीकडून लक्ष गेले नाही. दिवाळीमध्ये घरात विद्युत रोषणाई करत असताना 30 ऑक्टोबर 2021 रोजी सुनील पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी व दोन मुलांना विजेचा शॉक लागला. त्यामध्ये सुनील पवार यांचा मृत्यू झाला. त्यानंतर महावितरण कंपनीच्याचा अहवालात उच्च दाबाची वाहिनी जवळून गेल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यानुसार महावितरण कंपनीकडून गेल्या दोन दिवसांपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मोठी वायर आणून टाकण्यात आलेली असून ती खोदून नेण्याकरता खोदाई करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आता जवळून जाणारी धोकादायक विद्युत वाहक तार आता जमिनीखालून जाणार आहे.









