प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने शासनाने विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान महाराष्ट्रातून येणाऱया वाहनांची अडवणूक करून चौकशी केली. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात सीमाहद्दीवर चेकपोस्ट नाके उभारण्यात आले आहेत. याठिकाणी आता कडक कारवाई सुरू झाली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सीमाहद्दीवरील शिनोळी, राकसकोप, चलवेनहट्टी क्रॉस, अतिवाड फाटय़ावर चेकपोस्ट नाके उभारण्यात आले आहेत. या चेकपोस्ट नाक्मयांवर आता पोलीस बंदोबस्त वाढवून वाहनधारकांची चौकशी केली जात आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने चेकपोस्ट नाक्मयांवर वाहनधारकांना शिथिलता देण्यात आली होती. त्यामुळे आंतरराज्य प्रवास सोयीस्कर सुरू होता. मात्र आता पुन्हा कडक कारवाई सुरू झाल्याने कर्नाटकातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवास करणाऱया प्रवाशांसमोर अडचणी वाढल्या आहेत.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर सतत वाहनधारकांची ये-जा असते. दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून शासनाने नियम कडक केले आहेत. सीमाहद्दीवरून प्रवास करणाऱया प्रवाशांकडून आरटीपीसीआर, मास्क आणि इतर बाबींची चौकशी केली जात आहे.
राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्याने 19 जानेवारीपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. दोन आठवडे विकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सीमेवरील केरळ, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून कर्नाटकात येणाऱया प्रवाशांना 72 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह अहवाल आवश्यक आहे. तसेच लसीचे दोन डोस घेतलेले असले तरी आरटीपीसीआर बंधनकारक आहे, अशी माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.









