अमेरिकेत 200 डॉलर्समध्ये गायींची गळाभेट घेण्याचे प्रचलन
आठवडाभराचा तणाव असो किंवा दीर्घकालीन नैराश्य, कुठल्याही प्राण्याच्या स्पर्शाने मानवी मेंदूला मोठा दिलासा मिळतो. सर्वसाधारणपणे पाळीव प्राणी भोवतालच्या माणसांचे मन हलकं करतात. आता श्वान किंवा छोटय़ा प्राण्यांच्या व्यतिरिक्त गायींची गळाभेट घेण्याचा प्रकार चर्चेत आला आहे. भारतात विशेषकरून ग्रामीण भागांमध्ये गायींवर मायेने हात फिरविणे सामान्य बाब आहे. पण अमेरिकेत लोक यासाठी पैसे खर्च करण्यास तयार आहेत.

या वेलनेस ट्रेंडला ‘काउ कडलिंग’ नाव देण्यात आले आहे. यात गायीची गळाभेट घेत तिला प्रेमाने कुरवाळले जाते. अशाप्रकारे ताण आणि नैराश्ययुक्त भीती कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. या थेरपीची सुरुवात नेदरलँड्समध्ये करण्या आली आणि कोरोना महामारीदरम्यान अमेरिकेत याचा अवलंब वाढला आहे.
अमेरिकेच्या हवाई, न्यूयॉर्क, टेक्सास आणि लॉस एंजिलिसमध्ये हा प्रकार अत्यंत लोकप्रिय होत आहे. अनेक स्वयंसेवी संस्था यासाठी काम करत आहेत. काही ठिकाणी लोक एक तासासाठी 200 डॉलर्सपर्यंतची रक्कम खर्च करत आहेत. या रकमेतून गायींच्या देखभालीची व्यवस्था करण्यात येते.
प्राण्यांना कुरवाळल्याने ऑग्जिटोसिन हार्मोन निघून जात असल्याने आराम आणि शांततेची अनुभूती होती. प्राण्यांमध्येही याचा प्रभाव दिसून आला आहे. गायींच्या मानेवर आणि पाठीवर हात फिरविल्याने त्यांना शांतता मिळत असल्याचे अप्लाइड ऍनिमल बिहेवियर सायन्स जर्नलच्या एका अध्ययनात म्हटले गेले होते.









