प्रतिनिधी/ बेळगाव
वर्षभरात महापालिकेने अनुदान मंजुर झाले नसल्याने मागील 3 वर्षात राबविण्यात आलेल्या विकास कामाचा आढावा महापालिका आयुक्तांनी जिल्हापालकमंत्र्यांसमोर सादर केला. सद्य परीस्थितीची माहिती सादर करणे आवश्यक होते. पण यापूर्वी पूर्ण झालेल्या कामाची यादी सादर केल्याने महापालिकेच्या विकास कामाबद्दल असमाधानी असल्याचे सांगून जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी महापालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.
महापालिका कार्यालयात सोमवारी विकास आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीवेळी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी महापालिकेच्या विकास कामाचा आढावा मांडला. मागील वर्षात महापालिकेला अनुदान मिळाले नसल्याने प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. बहुतांश विकास कामांचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत करण्यात आल्याने शासनाकडुन मनपाला विशेष अनुदान देण्यात आले नव्हते. त्यामुळे मनपाकडे उपलब्ध असलेल्या निधीमधून विकास कामे राबवावी लागली. तसेच मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने विकास कामे राबविण्यात आली नाहीत. त्यामुळे विकास आढावा मांडण्याची गोची झाली होती. या कारणास्तव मागील 3 वर्षात एसएफसी अनुदान, 13 आणि 14 वा वित्त आयोग अनुदान व 100 कोटी विशेष अनुदानांतर्गत राबविण्यात आलेल्या विकास कामाची माहिती सादर केली. पण यावेळी मनपाच्या आर्थिक स्थितीची माहिती आयुक्तांनी मांडली नाही. त्याचप्रमाणे मनपाच्या अर्थसंकल्पाची माहिती सादर केली नसल्याने महापालिकेच्या कामकाजाबद्दल जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त केली. मनपाच्या कामाबाबत असमाधानी असून, पुढील बैठकीत विकास कामाची सविस्तर माहिती सादर करावी, अशी सूचना महापालिका आयुक्तांना केली.
यावेळी स्वच्छता आणि रस्त्याच्या समस्येबाबत तक्रारी करण्यात आल्या. महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीवर साचणाऱया कचऱयाची उचल करण्यास महापालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड टाळाटाळ करते. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. या समस्येबाबत तोडगा काढावा अशी सूचना आमदार अनिल बेनके यांनी केली. त्यामुळे कचऱयाच्या समस्येचा मुद्दा ऐरणीवर आला. रॅम्के कंपनीद्वारे कचऱयावर प्रक्रिया केली जाते. 100 टन कचऱयावर प्रक्रिया करण्याची क्षमता असून सध्या शहरात 260 टन हून अधिक कचरा साचत आहे. त्यामुळे यावर आवश्यक उपाय योजना राबविण्याची गरज असल्याचे चर्चेवेळी निदर्शनास आले. त्यामुळे कचऱयापासून विज निर्मिती करण्याचा प्रकल्प राबविण्याचा विचार मनपाने केला होता. या प्रकल्पाचे काय झाले असा मुद्दा जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी उपस्थित केला. शशिधर कुरेर यांच्याकडे महापालिका आयुक्त पदाची जबाबदारी असताना हा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव होता. त्यामुळे याबाबतची विचारणा शशिधर कुरेर यांच्याकडे करण्यात आली. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी नगर विकास खात्याकडे पाठविण्यात आला होता. अशी माहिती कुरेर यांनी दिली. सध्या प्रायोगिक तत्वावर लहान क्षमतेची यंत्रोपकरणे घेऊन कचऱयावर प्रक्रिया करावी अशी सूचना जिल्हा पालकमंत्र्यांनी केली.
बैठकीवेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आ. अनिल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. एस.बी.बोमनहळी, मनपा आयुक्त के. एच .जगदीश, पाणी पुरवठा मंडळाचे कार्यकारी अभियंता व्ही.एल.चंद्रप्पा, कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बर्चस्वा आदीसह विविध कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.









