जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाचा वर्षाव सुरूच
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणुकीमध्ये सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. मतदानावेळी मतदारांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदाच ईव्हीएमच्या माध्यमातून महापालिकेची निवडणूक घेण्यात आली. मात्र त्याला व्हीव्हीपॅट जोडले गेले नाही. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे जनतेची दिशाभूल करणारी ठरली असून तातडीने पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणी उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे.
महापालिकेची निवडणूक वादातच झाली. घाईगडबडीत निवडणूक घेण्यात आली. ईव्हीएम यंत्राला व्हीव्हीपॅट जोडलेच पाहिजे. मात्र व्हीव्हीपॅट का जोडले नाही, या मागचे कारण आता निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणीही केली आहे. या निवडणुकीमध्ये गोंधळ निर्माण झाला असून सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
वॉर्ड क्रमांक 50 मधून गीता मनोहर हलगेकर, वॉर्ड क्रमांक 19 मधून वर्षा विनोद आजरेकर, वॉर्ड क्रमांक 56 मधून शीला तुकाराम होसूरकर तसेच वॉर्ड क्रमांक 27 मधून संजय शिंदे यांनी निवडणूक लढविली. मात्र ही निवडणूक चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे आमचा पराभव झाला असून साऱयांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तेव्हा या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी आणि पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विनायक गुंजटकर, राजू बिर्जे, महेश जुवेकर, नेताजी देसूरकर, शांताराम होसूरकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









