विजय सरदेसाई यांचे आवाहन : सांत आंदेत भोबे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
प्रतिनिधी /पणजी
राज्यात महागाई कमी झालेली पाहायची असेल तर भाजपला घरी पाठवणे अत्यंत आवश्यक आहे आणि हाच लोकांसमोर पर्याय आहे, असे मत गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.
सांत आंदेचे नेते जगदीश भोबे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांत आंदेसाठी जाहीरनाम्याचे लोकार्पण करण्यात आले. सरचिटणीस मोहनदास लोलयेकर, संघटनमंत्री दुर्गादास कामत, दिलीप प्रभुदेसाई, पर्यावरण विभागाचे निमंत्रक विकास भगत आदींची त्यावेळी उपस्थिती होती.
’सांत आंदेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा विधानसभेत स्थानिक प्रश्न मांडण्यात अपयशी ठरले आहेत आणि त्यांनी केलेल्या पक्षांतराच्या प्रवृत्तीपासून या मतदारसंघाला मुक्त करण्याची गरज आहे. सांत आंदेचा विकास होत नाही, कारण चुकीची व्यक्ती या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. ’आमदारांमध्ये विकास करण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. विद्यमान आमदार खाजन आणि इतर स्थानिक प्रश्न विधानसभेत मांडण्यात पूर्णतः अपयशी ठरले. यासाठी इथे बदल घडवून आणण्याची गरज आहे, असे सरदेसाई पुढे म्हणाले.
सध्या भाजप सरकारात रात्रीच्या वेळी पक्षांतरे घडत आहेत. दिवसा सभापती उपलब्ध नसल्याने आमदारांना रात्रीच्या वेळी पक्षांतरे करावी लागत आहेत. आता तर निवडणुकीपूर्वीही पक्षांतरे होत आहेत. हे का घडत आहे याचा आपण विचार केला पाहिजे आणि लोकांचा विश्वासघात करणाऱया नेत्यांना धडा शिकवला पाहिजे.’’ असे सरदेसाई म्हणाले.
राज्यात महागाई कमी करायची असेल, तर सध्याच्या सरकारला घरी पाठवायचे आहे आणि लोकांच्या, मतदारसंघाच्या भल्यासाठी काम करू शकणारे उमेदवार निवडून आले पाहिजेत, असे ते म्हणाले.
पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नोकरी घोटाळय़ावरून भाजप सरकारवर केलेल्या आरोपाचा संदर्भ देत सरदेसाई यांनी या आणि इतर मुद्यांवरून भाजपवर लोकांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगितले.
जगदीश भोबे म्हणाले की, भाजपने राजकीय फायद्यासाठी म्हादईशी तडजोड केली आहे. त्यांना आग्वादचा किल्ला देखील विकायचा आहे. आता ते सरकारी नोकऱया विकून, पात्र उमेदवारांना वंचित ठेवत आहेत. निवडणुकीत खर्च करण्यासाठी भाजप पैसे जमवत आहे.“ असा आरोप भोबे यांनी केला.
विकास भगत म्हणाले की, भाजप भ्रष्ट असून नोकऱया विकण्यात गुंतलेला आहे. भाजपने केवळ पर्यावरणाचा नाशच केला नाही, तर आपल्या राज्याचाही ऱहास केला आहे.
नोकऱयांसाठी पैसे द्यायचे असतील तर भाजपला मत द्या, अन्यथा गोवा फॉरवर्डला मत द्या. “भाजपचेच आमदार सांगतात की नोकऱया विकल्या जातात. मात्र, मुख्यमंत्री प्रमोद सावंत या प्रकरणाची चौकशी करण्यास तयार नाहीत. भाजप नेत्यांना हा लुटलेला पैसा निवडणुकीसाठी वापरायचा आहे.“ असे लोलयेकर म्हणाले.









