प्रतिनिधी /वास्को
गोव्यातील प्रसिध्द ऑर्पेस्ट्रा कलाकार अन्वर शेख (57) यांचा खून झालेल्या अवस्थेत झुआरीनगरातील विद्यानगर या वसाहतीतील रस्त्यावर शनिवारी रात्री मृतदेह आढळून आला. त्यामुळे खळबळ माजली आहे. बायणा येथील अन्वर शेख हे सध्या झुआरीनगरातच राहात होते. पाच दिवसांत वेर्णा पोलीस स्थानक हद्दीत घडलेली ही खुनाची दुसरी घटना आहे.
वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास उघडकीस आली. एक अज्ञात व्यक्ती रक्ताच्या थारोळय़ात पडलेली असल्याचे दिसून येताच झुआरीनगरातील विद्यानगर वसाहतीतील काहींनी वेर्णा पोलिसांना माहिती दिली. बऱयाच वेळाने मयताची ओळख पटली. मयत अन्वर शेख गंभीर जखमी अवस्थेत या वसाहतीतील अंतर्गंत रस्त्यावर पडलेले होते. तेथील काहींनी त्यांना चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांना मृत घोषीत करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत पडलेला पाहून घटनास्थळी लोकांमध्ये खुनाचा संशय बळावला.
कपाळावर धारधार शस्त्राचे वार
मयताच्या कपाळावर कसल्या तरी धारधार हत्याराने हल्ला करण्यात आलेला आहे. वेर्णा पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. वेर्णा पोलीस या खून प्रकरणासंबंधी अधिक तपास करीत आहेत. मात्र, अद्याप संशयीताचा सुगावा लागलेला नाही.
मयत अन्वर शेख हे मागच्या चाळीस वर्षांहून अधिक काळ ऑर्केस्ट्रात गायक कलाकार म्हणून गोव्यात प्रसिध्द होते. ऑकेस्ट्रा तसेच अन्य खासगी कार्यक्रमांमधूनही ते गायचे. त्यांनी काही वर्षांपूर्वी एमपीटीमधून स्वेच्छा निवृत्ती स्विकारली होती. मूळ इस्लामपूर बायणा येथील असलेले मयत शेख हे सध्या झुआरीनगरात राहायचे.
वेर्णात पाच दिवसांत खुनाचे दुसरे प्रकरण
वेर्णात पाच दिवसांपूर्वीच नोकरीच्या शोधात गोव्यात आलेल्या एका युवकाने मध्यरात्री एका दारूडय़ाशी झालेल्या भांडणात त्याला ढकलल्याने त्याचे डोके पायऱयांवर आढळून त्याला मृत्यू आला होता. त्यामुळे त्या युवकाविरूध्द खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. पाच दिवसांनंतर वेर्णा पोलीस स्थानक हद्दीत घडलेले हे दुसरे खून प्रकरण आहे.









