ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यामध्ये महसुलाचा ओघ सुरू करण्याच्या दृष्टीने काही मागण्या केल्या आहेत. यामध्ये लॉक डाऊन मध्ये बंद करण्यात आलेली दारूची दुकाने सुरू करण्यास काय हरकत आहे असा प्रश्न करत या पत्रात राज्याचे अर्थचक्र पुन्हा सुरू करण्यास काही मुद्दे मांडले आहेत.
पुढे ते म्हणाले, गेल्या 35 दिवसांपासून राज्यातील उपहारगृहे आणि रेस्टॉरंट पूर्णपणे ठप्प आहेत. ह्याचा फटका जसा हॉटेल मालकांना बसला तसा सामान्य माणसाला देखील बसला आहे . आता हॉटेल फक्त चैनीची नव्हे तर गरजेची गोष्ट बनली आहे.
तसेच वाईन शॉप्स सुरु करा ह्याचा अर्थ दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा नाही तर राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा हा आहे. हा विषय निव्वळ राज्याच्या महसुलाचा आहे, जो पूर्ण आटला आहे. आज पेट्रोलपंप जवळपास बंद आहेत, राज्यातील जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत, आणि दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला 41.66 कोटी, महिन्याला 1250 कोटी आणि वर्षाला 15000 कोटी मिळतात. आता जवळपास राज्य 35 दिवस टाळेबंदीत आहे आणि पुढे किती दिवस राहील याचा अंदाज नाही. यावरून आपण किती महसूल गमावलाय आणि गमावू याचा अंदाज येईल, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणतात, एक एक गोष्ट सुरू करत राज्याचे अर्थ चक्र सुरू केले पाहिजे. केंद्राकडून मदत मिळेल तेव्हा मिळेल. ती किती मिळेल हे पण माहित नाही त्यामुळे आत्ता पासूनच आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्यास यासारखे मार्ग शोधावेच लागतील असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.









