ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1 हजार 409 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 21 हजार 393 पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 681 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 380 रुग्ण बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4 हजार 258 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.
ते म्हणाले, 78 जिल्ह्यांमध्ये गेल्या चौदा दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही आहे. यामध्ये 33 नव्या जिल्ह्यांचा समावेश आहे. सद्य स्थितीत देशात कोरोना रुग्ण कमी होण्याचे प्रमाण 19.88 आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना राज्याने सुरक्षा द्यावी अशा आशयाचे पत्रदेखील सर्व राज्यांना देण्यात आले आहे.
देशातील लॉक डाऊन चे वातावरण संतोषजनक असून शहरी भागात दूध, मध प्रक्रिया उद्योग, शेतमाल उद्योग आदी व्यवसायांना सूट देण्यात आली आहे. तसेच जहाजावर अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोबाईल च्या प्रीपेड रिचार्जसाठी विशेष सूट देण्यात आली आहे. असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
आज लॉक डाऊन सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. आम्ही टेस्टिंग ला एक उपाय म्हणून उपयोगात आणत आहोत. तसेच टेस्टिंग ची क्षमता वाढवण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत पाच लाखांपेक्षा अधिक लोकांचे टेस्ट करण्यात आली आहे. गेल्या तीस दिवसात टेस्टिंग चे प्रमाण 33 टक्क्यांनी वाढले आहे, असे आयसीएमआर च्या प्रवक्त्यांनी यावेळी सांगितले.









