तृणमूलच्या राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविणाऱया तृणमूल काँग्रेसची शनिवारी मोठी बैठक झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक यांना पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सायोनी घोष यांना तृणमूल युथ काँग्रेसची जबाबदारी देण्यात आली आहे. बैठकीत ममता बॅनर्जी देखील सामील झाल्या होत्या.
पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी काही नवी पावले उचलली आहेत. पक्षात यापुढे एक व्यक्ती एक पद धोरण लागू होणार आहे. भारताच्या जनतेच्या सेवेसाठी तृणमूल काँग्रेस प्रतिबद्ध असून हीच पक्षाची सर्वात मोठी प्राथमिकता असल्याचे तृणमूल काँग्रेसकडून ट्विट करत म्हटले गेले आहे.
अभिषेक हे ममता बॅनर्जी यांचे बंधू अमित बॅनर्जी यांचे पुत्र आहेत. 2014 पासून डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघाचे अभिषेक प्रतिनिधित्व करत आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत अभिषेक यांनी पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भाजपविरोधी तृणमूलच्या प्रचार मोहिमेत सामील मुख्य नेत्यांपैकी ते एक होते.









