फेसबुककडून कठोर धोरण -ट्रम्प यांच्याकडून टीका
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
फेसबुकने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकौंट दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे. दोन वर्षांचा कालावधी 7 जानेवारी 2021 पासून मोजला जाणार आहे. त्याचदिवशी पहिल्यांदा ट्रम्प यांचे अकौंट निलंबित करण्यात आले होते. फेसबुकचे उपाध्यक्ष निक क्लेग यांनी ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
ट्रम्प आता 7 जानेवारी 2023 पर्यंत स्वतःचे फेसबुक अकौंट हाताळू शकणार नाहीत. म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये होणाऱया मिड टर्म इलेक्शनवेळीही त्यांना फेसबुकपासून दूर रहावे लागणार आहे.
हा मतदारांचा अपमान
ट्रम्प यांनी फेसबुकच्या या कारवाईला 7.5 कोटी लोकांचा अपमान ठरविले आहे. 2020 मध्ये ट्रम्प यांना 7.5 मते मिळाली होती. अशा लोकांना सेंसर करत गप्प बसविता येणार नाही. आमचा देश अशाप्रकारचा अपमान अधिक काळ सहन करू शकत नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्विटरवरून कायमस्वरुपी बंदी
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालानंतर 6 जानेवारी रोजी तेथील संसद कॅपिटल हिलबाहेर हिंसा झाली होती. यादरम्यान ट्रम्प यांच्यावर समर्थकांना चिथावणी दिल्याचा आरोप होता. याचमुळे 7 जानेवारी रोजी फेसबुकसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी ट्रम्प यांच्याविरोधात कारवाई केली होती. इन्स्टाग्राम आणि युटय़ूबनेही ट्रम्प यांचे अकौंट निलंबित केले होते. तर ट्विटरने ट्रम्प यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घातली आहे.









