प्रतिनिधी/ बेळगाव
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेला महात्मा गांधी शहर विकास योजनेंतर्गत 125 कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. या अनुदानांतर्गत कृती आराखडा तयार करून मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, कृती आराखडय़ाला तांत्रिक मंजुरी मिळालीच नाही. पण सदर निधी देण्याचे रद्द करण्यात आल्याची माहिती महापालिकेला देण्यात आली आहे. त्यामुळे 125 कोटीचे अनुदान परत गेले आहे.
शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री विकास अनुदानांतर्गत महापालिकेला 400 कोटींचे अनुदान देण्यात आले होते. मागीलवषी विविध विकासकामे राबविण्यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी नगर विकास योजनेंतर्गत मार्च 2019 मध्ये 125 कोटी अनुदान महापालिकेला देण्याची घोषणा करून मंजुरी दिली होती. पण या अंतर्गत अंदाजपत्रक व कृती आराखडा तयार करण्यास महापालिकेकडून विलंब झाला होता. सदर अनुदानांतर्गत विकासकामे राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या कृती आराखडय़ाची स्कुटनी करून तांत्रिक मंजुरी मिळणे आवश्यक होते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निविदा काढण्यात येणार होत्या. त्यामुळे मंजुरीकरिता महापालिकेने 125 कोटींचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविला होता. मंजुरी देण्याऐवजी सदर अनुदान देण्याचे रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार वाढल्याने शासनाकडून देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आले आहे. विविध योजनादेखील सध्या स्थगित ठेवल्या आहेत. महापालिकेला देण्यात येणारे हे अुनदानदेखील रद्द केले आहे. त्यामुळे महापालिकेला मंजूर झालेला 125 कोटींचा निधी परत गेला आहे.
125 कोटी अनुदानांतर्गत रस्त्यांचा विकास व नाल्यांचे काँक्रिटीकरण तसेच व्यापारी संकुलांची उभारणी अशा विविध महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा प्रस्ताव होता. त्याचप्रमाणे शहरवासियांना रस्ते, गटारी, पाण्याची सुविधा आदींसह नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद या निधीअंतर्गत केली होती. पण महापालिकेकडून झालेल्या विलंबामुळे हा निधी परत गेला आहे. बेळगाव महापालिकेसह राज्यातील विविध महापालिकांना मंजूर करण्यात आलेला निधी रद्द करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









