प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या राखीव अनुदानातून दिव्यांगांसाठी तीनचाकी मोटारसायकल आणि स्वयंरोजगार योजना राबविण्यात येतात. याकरिता अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने केले होते. मात्र, शहर व उपनगरांतून तीनचाकी मोटारसायकलकरिता केवळ एकच अर्ज महापालिकेकडे दाखल झाला आहे. त्यामुळे गरजूंनी याकरिता अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेला मंजूर होणाऱया निधीमधून 5 टक्के अनुदान दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात येते. या अंतर्गत दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. 75 टक्क्मयांहून अधिक अपंगत्त्व असलेल्या व्यक्तींना तीनचाकी मोटारसायकल देण्यात येते. स्वयंरोजगार योजना व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे यंदा उपलब्ध असलेल्या निधीमधून योजनेंतर्गत विविध लाभांकरिता अर्ज करण्याचे आवाहन केले होते. पण याकरिता प्रतिसाद लाभला नाही. तीन चाकी मोटारसायकलकरिता केवळ एकच अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे अर्ज घेण्याची मुदत वाढविण्यात आली असून, तीनचाकी मोटारसायकल व स्वयंरोजगार योजनेंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी साहाय्य धनाकरिता अर्ज करण्याची मुभा आहे. त्यामुळे गरजूंनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी आधार ओळखपत्र आणि 75 टक्के अपंगत्त्व असल्याच्या दाखल्यासह विविध कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या गरिबी निर्मूलन विभागात अर्ज करण्यात यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.









