मोटार सायकलवरुन आलेल्या भामटय़ांची छबी सीसीटीव्हीत कैद
प्रतिनिधी/ बेळगाव
दवाखान्यातून गावी परतण्यासाठी चालत जाणाऱया चिकदीनकोप्प येथील एका महिलेच्या गळय़ातील साडेचार तोळय़ाचे दागिने हिसकावून घेवून भामटय़ांनी पलायन केले आहे. शुक्रवारी भर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मठ गल्ली परिसरात ही घटना घडली असून मोटार सायकलवरुन आलेल्या दोघा भामटय़ांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
चेन स्नॅचिंगच्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या संबंधी सुजाता पारिश पाटील (रा. चिकदीनकोप्प, ता. खानापूर) यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. भा.दं.वि. 392 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. चेन स्नॅचिंगच्या घटनेनंतर भामटय़ांच्या शोधासाठी शहरातील इतर पोलीस स्थानकांनाही माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुजाता पाटील या आपल्या सुनबाईला घेवून दवाखान्यात आल्या होत्या. येथील गिजरे हॉस्पिटलमध्ये सुनेची तपासणी झाल्यानंतर गावी जाण्यासाठी त्या दवाखान्यातून बाहेर पडल्या.
टिळक चौक परिसरातून शनिमंदिराच्या पाठिमागील रस्त्यावरुन त्या मध्यवर्ती बस स्थानकाकडे जात होत्या. दुपारी 4 वाजता मठगल्ली येथील जैन बसतीजवळ पोहोचल्या त्यावेळी मोटार सायकलवरुन दोघे भामटे तेथे आले. सुजाता यांच्या जवळ येताच मोटार सायकलचा वेग कमी झाला. पाठिमागे बसलेल्या भामटय़ाने सुजाता यांच्या गळय़ातील चार तोळय़ाचे गंठण व पाच तोळय़ाची चेन हिसडा मारुन पळवून नेली.
या घटनेनंतर महिलेने आरडाओरड केली. लोक जमा होण्याआधी भामटय़ांनी तेथून पलायन केले होते. 2 लाख 7 हजार रुपये किंमतीचे दागिने भामटय़ांनी पळविले आहेत. मार्केट पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी दागिने पळविणाऱया भामटय़ांची छबी कैद झाल्याचे आढळून आले.
फुटेजवरुन भामटय़ांचा शोध
सीसीटीव्ही फुटेजवरुन दोन्ही भामटय़ांचा शोध घेण्यात येत आहे. मोटार सायकल चालविणारा हेल्मेट परिधान केला होता. तर पाठिमागे बसलेल्या भामटय़ाने डोक्यावर कॅप परिधान केली आहे. फुटेजवरुन भामटय़ांचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांचे चेहरे ओळखता येत नसले तरी मोटार सायकलचा क्रमांक मिळविता येतो यासाठी प्रयत्न सुरू आहे.









