नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात शुक्रवारी 23 हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेचे ढग गडद झाले आहेत. नव्या वाढीव रुग्णांमुळे आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा 1 कोटी 13 लाख 08 हजार 846 इतका झाला आहे. तसेच गेल्या चोवीस तासात 117 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1 लाख 58 हजार 306 बळी गेले आहेत. गेल्या आठवडाभरात सातत्याने वाढत चाललेल्या रुग्णांमुळे भारतात कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा वेगाने फैलाव होत असल्याचे दिसत आहे.
आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अखेरच्या 24 तासात देशात 23 हजार 285 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. चालू वर्षातील ही एका दिवसातील सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. गुरुवारच्या तुलनेत हा आकडा चारशेने वाढला आहे. तसेच आतापर्यंत 1 कोटी 09 लाख 53 हजार 303 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या भारतात सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 97 हजार 237 इतकी झाली आहे. गेल्या पंधरवडय़ात नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. तसेच गेल्या पंधरा दिवसात चाचण्यांचा वेगही वाढवण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढत चालली आहे.
देशात कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्याचे चित्र आहे. रुग्णवाढीमुळे आता केंद्रीय प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनाकडून संबंधित राज्यांना योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लसीकरणामुळे रुग्णसंख्या कमी होईल असा अंदाज वर्तवला जात असला तरी अनेक ठिकाणी कोरोनाबाबत निष्काळजीपणा बाळगला जात असल्याने रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे.









