वार्ताहर/ किणये
बेळगाव-चोर्ला रोडवरील मच्छे औद्योगिक वसाहतीनजीक रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला दुचाकीस्वाराने धडक दिल्यामुळे मच्छे गावातील एक तरुण ठार झाला. रोशन कृष्णा बेळगावकर (वय 20, रा. बेळगावकर गल्ली, मच्छे) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. सदर अपघात शुक्रवारी रात्री 8.45 च्या दरम्यान घडला.
काही कामानिमित्त रोशन मच्छेहून औद्योगिक वसाहतमार्गे बेळगाव-चोर्ला रस्त्यावरून बाळगमट्टीला जात होता. रस्त्यावर काही ट्रक रांगेत उभे होते. अंधार असल्यामुळे थांबलेल्या ट्रकचा रोशनला अंदाज आला नाही व दुचाकी थेट ट्रकला जाऊन धडकली. या अपघातात रोशनच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला ताबडतोब उपचारासाठी हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली.
मच्छे औद्योगिक वसाहतीनजीक बेळगाव-चोर्ला रोडवर एका प्रसिद्ध कंपनीच्या समोरच मुख्य रस्त्याच्या बाजूला नेहमी अवजड वाहने थांबविली जातात. याचा रस्त्यावरून ये-जा करणाऱया इतर वाहनधारकांना त्रास होतो. रस्त्यावर थांबविलेल्या ट्रकमुळेच रोशनचा मृत्यू झाला. या अपघातात रोशनच्या दुचाकीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी रात्री अपघातात एक युवक ठार झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेल्या त्या ट्रक हलविण्यात आल्या. शनिवारी या रस्त्यावर ट्रक दिसून आल्या नाहीत. सदर रस्त्यावर ट्रक थांबवू नयेत, अशी मागणीही मच्छे गावातील नागरिकांतून होत आहे.
सरकारी हॉस्पिटलमध्ये शवचिकित्सा करून शनिवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रोशनच्या पश्चात आजी, आई-वडील, एक बहीण असा परिवार आहे. कृष्णा बेळगावकर यांचा तो एकुलता चिरंजीव असल्याने अपघातात त्याचा मृत्यू झाल्यामुळे मच्छे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









