वृत्तसंस्था/ लंडन
प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात क्रिस्टल पॅलेसने मँचेस्टर सिटीचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केल्याने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात चेल्सी संघाने आघाडीचे स्थान मिळविले. चेल्सीने न्यू कॅसल युनायटेडचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत पूर्ण गुण वसूल केले. लिव्हरपूल आणि ब्रिटॉन-होवे अल्बियान यांच्यातील सामना बरोबरीत राहिला.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या सामन्यात चेल्सीने न्यू कॅसल युनायटेडचा एकतर्फी पराभव केला. चेल्सीतर्फे रेसी जेम्सने दोन गोल तर जार्गिनोने पेनल्टीवर एक गोल नोंदविला. या विजयामुळे चेल्सीने 10 सामन्यांतून 25 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. लिव्हरपूल 22 गुणांससह दुसऱया स्थानावर आहे. मँचेस्टर सिटी तिसऱया स्थानावर आहे.
शनिवारी झालेल्या या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात क्रिस्टल पॅलेसने मँचेस्टर सिटीचे आव्हान 2-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले. क्रिस्टल पॅलेसतर्फे विल्प्रेड झेआने सहाव्या मिनिटाला तर लेपोर्टिने मध्यंतराला काही मिनिटे बाकी असताना गोल नोंदविले.









