ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी पुरुषोत्तम शर्मा पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. आयपीएस पुरुषोत्तम शर्मा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शर्मा हे स्वतःच्या पत्नीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. तसेच शर्मा यांनी मारहाण केल्याची कबुलीही दिली आहे.

या प्रकरणी मध्य प्रदेश सरकारने कडक पाऊले उचलली असून पुरुषोत्तम शर्मा यांना त्या प्रभागातून निलंबित करण्यात आले असून त्याची बदली करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा यांच्या पत्नीने त्यांना दुसऱ्या महिलेबरोबर रंगेहाथ पकडल्यानंतर शर्मा यांनी मारहाण केली. पत्नीने शर्मा यांना रंगेहाथ पकडल्यानंतर शर्मा आणि पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. घरी आल्यानंतरही या दोघांमधील वाद अगदी शिगेला पोहचला. त्यामुळेच संतापलेल्या शर्मा यांनी पत्नीला बेदम मारहाण केली. याच मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
शर्मा आपल्या पत्नीला मारहाण करत असतानाच काही जण त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न करत होते. मात्र कोणाचेही काहीही न ऐकता शर्मा पत्नीला मारहण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते.
दरम्यान, शर्मा यांच्या मुलाने या घटनेचा व्हिडिओ काढला असून हा व्हिडिओ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पाठवत वडीलांविरोधात तक्रार करत वडिलांवर कारवाई करण्याची मागणी केली.
यावर गृह मंत्रालयाने एक निवेदन सादर करत शर्मा यांना तत्काळ निलंबित केले असून त्यांची बदली देखील करण्यात आली आहे.









