पोलीस आयुक्तांनी दिला इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारी होणाऱया कर्नाटक बंदच्या पार्श्वभूमीवर बेळगावात कायदा हातात घेणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी दिला आहे. यासंबंधी रविवारी रात्री त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
शेतकरी संघटना, कन्नड संघटना व दलित संघटनांच्या कर्नाटक बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. आयोजकांनी कोणत्याही परिस्थितीत बळजबरीने व्यापार-उद्योग बंद करण्याचा प्रयत्न करू नये, अशी सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे.
वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण होईल, असे कृत्य करू नये. खासकरून रुग्णवाहिका, परिवहन सेवा, अग्निशामक दलाची वाहने व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने अडवू नयेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे. मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखण्यात यावे. केंद्र व राज्य सरकारी कार्यालयांना अडथळे निर्माण करू नयेत, अशा सूचनाही पोलीस आयुक्तांनी केल्या आहेत.









