वार्ताहर /शिवोली
दिवंगत मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी मंत्री असताना अनेक विकास कामांना प्राधान्य दिले होते. पर्यटनदृष्टय़ा महात्वाच्या असलेल्या हणजुण परिसरातील वीजची समस्या लक्षात घेऊन त्यांनी भूमीगत वीजवाहिन्यांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली. हा प्रकल्प पूर्णत्वास येत असून हणजुण व आसगाव परिसरातील लोकांची 80 टक्के वीजेची समस्या सुटणार असल्याची माहिती शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी दिली.
हणजुण येथे नुकतेच भूमिगत वीजवाहिन्या सबस्टेशनच्या उद्घाटनप्रसंगी पालयेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासोबत अधीक्षक अभियंते स्टीफन, अधिकारी मलप्पा, हणजुण-कायसुव पंचायतीचे सरपंच साविया आल्मेदा व हणजुण कोमुनिदादचे अध्यक्ष उपस्थित होते.
आमदार विनोद पालयेकर यांच्याहस्ते सबस्टेशनचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच सिद्धेश्वर देवस्थानचे पुरोहित संकेश जोशी यांच्याहस्ते पूजा करण्यात आली.
स्वर्गीय पर्रीकर यांनी शिवोलीतील रस्त्यांच्या हॉटमिक्सींगच्या कामासाठी अंदाजे 80 कोटी रुपयांपर्यंत कामांना चालना दिली होती. ती येणाऱया ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे नागरिकांना चांगले रस्ते मिळणार आहे, असे पालयेकर म्हणाले.
बादे येथे 33 कोटी खर्चुन सबस्टेशन
वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी आपल्याला वेळोवेळी साथ दिलेली आहे. त्यांच्या सहकार्याने अनेक कामे आपण हाती घेतलेली आहे. काब्राल व अधीक्षक अभियंते स्टीफन यांच्या सहकार्याने आसगाव पंचायतीच्या क्षेत्रातील बादे येथे अंदाजे 33 कोटी रुपये खर्चुन आणखी सबस्टेशन उभारण्यात येणार आहे व त्यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा करीत आहे, असे पालयेकर यांनी सांगितले.









