सुटीच्या दिवशी पर्यटकांच्या संख्येत वाढ, महसुलातही वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाकडे पर्यकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे दैनंदिन 300 ते 400 तर शनिवार, रविवारी विकेंडला 1 हजार पर्यटक भेट देत आहेत. त्यामुळे संग्रहालयाच्या उत्पन्नात साहजिकच वाढ झाली आहे. त्यातच हिजाब प्रकरणामुळे तीन दिवस हायस्कूल, महाविद्यालये बंद राहिल्याने तरुण पर्यटकांची संख्या वाढली आहे.
भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाचा विकास साधला जात आहे. शिवाय सिंह, वाघ, बिबटे, कोल्हे, तरस, सांबर यासह दुर्मीळ पक्षी दाखल झाले आहेत. त्यामुळे निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमींचा ओढा वाढला आहे. संग्रहालयात फिरणाऱया पर्यटकांची संख्या वाढली आहे. दैनंदिन 300 ते 400 जण संग्रहालयाला भेटी देत आहेत. प्रशासनाने विकेंड कर्फ्यू पाठोपाठ नाईट कर्फ्यू मागे घेतल्यानंतर पर्यटकांची पावले संग्रहालयाकडे वळत आहेत.
मागील वर्षापासून टप्प्याटप्प्याने मोठे वन्यप्राणी दाखल झाले. दरम्यान कोरोनामुळे बरेच दिवस संग्रहालय बंद ठेवण्यात आले. त्यामुळे उत्पन्न थांबले होते. दरम्यान वन्यप्राण्यांच्या देखभालीचा प्रश्न व्यवस्थापकांसमोर उभा राहिला. यासाठी दत्तक योजना राबविली गेली. या योजनेला प्रतिसाद देत काहींनी वन्यप्राणी दत्तक घेतले. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या देखभालीचा प्रश्न मार्गी लागला. आता प्राणी संग्रहालय पूर्वपदावर येत असल्याने भेटी देणाऱया पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत आहे.
प्राणीसंग्रहालय मंगळवार वगळता दररोज सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत खुले ठेवले जात आहे. नोकरदार, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवार-रविवार व इतर सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येत आहे.









