वृत्त संस्था/ ऍरहस
डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या सांघिक उबेर चषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताने दर्जेदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली. मंगळवारी येथे झालेल्या लढतीत भारताने स्कॉटलंडचा 4-1 अशा फरकाने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
या स्पर्धेत भारताचा ब गटात समावेश आहे. या गटातून भारतीय महिला बॅडमिंटन संघ सध्या दुसऱया स्थानावर आहे. भारताने या गटातील आपल्या दोन्ही लढती जिंकल्या आहेत. पहिल्या लढतीमध्ये गेल्या रविवारी भारताने स्पेनवर 3-2 अशी मात केली होती. स्पेनविरूद्ध लढतीमध्ये भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालला स्नायू दुखापतीमुळे आपल्या सामन्यातून निवृत्त व्हावे लागले होते.
भारत आणि स्कॉटलंड यांच्यातील झालेल्या लढतीत महिलांच्या पहिल्या एकेरी सामन्यात स्पेनच्या गिल्मुरने भारताच्या मालविका बनसूदचा 21-13, 21-9 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात भारताच्या आदिती भट्टने स्पेनच्या रॅचेल सुगडेनचा 21-14, 21-8 असा पराभव करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर महिला दुहेरीच्या सामन्यात भारताच्या तनिशा क्रेस्टो आणि रूतुपर्णा पांडा यांनी स्कॉटलंडच्या ज्युली आणि टोरेन्स यांचा 21-11, 21-8 असा पराभव करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
परतीच्या एकेरी सामन्यात भारताच्या तस्नीमने स्कॉटलंड मिडलटोनवर 21-15, 21-6 अशी मात केली. परतीच्या दुहेरीच्या सामन्यात भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने स्कॉटलंडच्या गिल्मर आणि ओडोनील यांचा 53 मिनिटांच्या लढतीत 21-8, 19-21, 21-6 असा पराभव करत स्कॉटलंडचे आव्हान 4-1 अशा फरकाने संपुष्टात आणले. या स्पर्धेत भारताची पुढील लढत बुधवारी बलाढय़ थायलंडशी होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात भारताने 2014 साली दिल्ली तर 2016 साली कुनसेन येथे झालेल्या स्पर्धेत दोनवेळा उपांत्य फेरी गाठली आहे.









