प्रतिनिधी/ नवारस्ता
देशात दगडी कोळशाच्या आयातीत अडथळे निर्माण झाल्याने संपूर्ण देशाला येत्या काही दिवसांमध्ये अभूतपूर्व वीजटंचाईला तोंड द्यावे लागत असताना महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱया कोयना धरणातून पूर्ण क्षमतेने आणि वेगाने वीजनिर्मिती सुरू झाली आहे. त्यासाठी धरणातील तब्बल अर्धा टीएमसीपेक्षा जास्त पाण्याचा वापर दररोज केला जात आहे. त्यामुळे विजेच्या अडचणीच्या काळात आता देशाच्या मदतीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी धावली असल्याचे दिसत आहे.
आरक्षित पाणी कोटय़ावर परिणाम होणार नाही
105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षपूर्तीच्या लवादाचे 1 जून ते 31 मे या वर्षासाठी असते. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठय़ापैकी 67.50 टीएमसी पाणीसाठा पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी असतो, तर पूर्वेकडील सिंचनासाठी 30 टीएमसी पाण्याचा वापर केला जातो.
सध्याच्या या जादा पाणीवापरामुळे लवादाच्या आरक्षित पाणी कोटय़ावर त्याचा परिणाम होईल की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या देशात औष्णिक विजेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे कोयना धरणातून जादा प्रमाणात वीजनिर्मिती आणि जादा प्रमाणात पाण्याचा वापर सुरू आहे. आरक्षित पाण्याचा तांत्रिक वर्षात सिंचन विभाग कधीही वापर करू शकतो. त्यामुळे भविष्यात आरक्षित पाण्यावर या जादा पाणी वापराचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे कोयना सिंचन विभागाने स्पष्ट केले.








