वृत्तसंस्था/ दुबई
भारतीय महिला फुटबॉल संघ सध्या संयुक्त अरब अमिरातच्या दौऱयावर आहे. शनिवारी भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात पहिला मित्रत्वाचा आंतरराष्ट्रीय सामना खेळविला जाणार आहे. भारतीय महिला फुटबॉल संघ या वर्षातील पहिला विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करेल.
2021 च्या फुटबॉल हंगामामध्ये भारतीय महिला फुटबॉल संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यांना एकही विजय नोंदविता आलेला नाही. युरोपियन संघाविरुद्ध खेळताना भारतीय महिला संघाला आपला दर्जा सुधारण्याची संधी मिळाली आहे. फिफाच्या मानांकनात भारतीय संघ 57 व्या स्थानावर आहे. येत्या जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान भारतात होणाऱया एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून भारतीय फुटबॉल फेडरेशनने महिला संघासाठी संयुक्त अरब अमिरातचा दौरा आयोजित केला आहे. या दौऱयात भारतीय संघ पाच सामने खेळणार आहे. सोमवारी भारत आणि टय़ुनिशिया यांच्यातील सामना येथे खेळविला जाणार आहे. गेल्या एप्रिलमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात बेलारुसने भारतीय महिला फुटबॉल संघाचा 2-1 असा पराभव केला होता.









