विजयाच्या ट्रकवर परतण्यासाठी दिल्ली प्रयत्नशील, मुंबईसमोर सातत्य राखण्याचे आव्हान
शारजाह / वृत्तसंस्था
मागील सामन्यात पराभवाचा धक्का बसलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज (दि. 2) मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात पुन्हा विजयाच्या ट्रकवर परतण्याचा प्रयत्न करेल. याचवेळी झगडणाऱया मुंबई इंडियन्स संघाची विजयी मोहीम कायम राखण्याची महत्त्वाकांक्षा असणार आहे. उभय संघातील ही लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 3.30 वाजता खेळवली जाईल.
8 विजयांसह प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित केलेल्या दिल्लीचा संघ यापूर्वी शारजाहच्या स्लो ट्रकवर मागील लढतीत पराभूत झाला. केकेआरने त्यावेळी लो स्कोअरिंग लढतीत दिल्लीला 3 गडी राखून नमवले. मात्र, त्या पराभवाची येथे भरपाई करण्याचा दिल्लीचा प्रयत्न असेल. मागील लढतीत केकेआरने स्लो ट्रकचा पुरेपूर विनियोग करत दिल्लीला चांगलेच रोखून धरले. निर्धारित 20 षटकात दिल्लीचा एकही फलंदाज षटकार खेचू शकला नाही, हे त्यावेळी लक्षवेधी ठरले होते.
सुनील नरेन व वेंकटेश अय्यर यांनी भेदक मारा साकारल्यानंतर दिल्लीला त्या लढतीत 9 बाद 127 अशा किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले होते. केवळ स्टीव्ह स्मिथ (34 चेंडूत 39) व रिषभ पंत (36 चेंडूत 39) यांनी थोडीफार फटकेबाजी केल्यामुळेच दिल्लीला सव्वाशे धावांचा टप्पा कसाबसा सर करता आला होता. मात्र, आता पृथ्वी शॉ तंदुरुस्त होऊन परतत असल्याने त्याच्याकडून फटकेबाजीची संघाला अपेक्षा असेल. स्टोईनिसला मात्र पुनरागमनासाठी अद्याप थोडा वेळ लागू शकतो. रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल व ललित यादव हे दिल्लीचे फिरकीतील त्रिकुट पुन्हा एकदा उत्तम योगदान देण्याच्या महत्त्वाकांक्षेने मैदानात उतरु शकेल.
सध्या दिल्लीच्या खात्यावर 11 सामन्यात 16 गुण असून साखळी फेरीअखेर पहिल्या दोन संघांमध्ये स्थान कायम राखणे, हे त्यांचे लक्ष्य असणार आहे. असे झाल्यास अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी त्यांना दोनवेळा संधी मिळू शकेल. या हंगामात आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यात दिल्लीला फक्त 3 वेळा पराभव पचवावे लागले आहेत. उर्वरित 8 लढतीत मात्र त्यांनी उत्तम वर्चस्व गाजवले आहे.
संभाव्य संघ
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा (कर्णधार), क्विन्टॉन डी कॉक, इशान किशन, सुर्यकुमार यादव, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, ख्रिस लिन, सौरभ तिवारी, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, जेम्स नीशम, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, मार्को जान्सन, युद्धवीर सिंग, ऍडम मिल्ने, धवल कुलकर्णी, जसप्रित बुमराह, मोहसिन खान, नॅथन काऊल्टर-नाईल, पीयूष चावला, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट.
दिल्ली कॅपिटल्स ः रिषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, रिपल पटेल, शिखर धवन, शिमरॉन हेतमेयर, श्रेयस अय्यर, स्टीव्ह स्मिथ, अमित मिश्रा, ऍनरिच नोर्त्झे, अवेश खान, बेन डॉर्शुईस, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, कुलवंत खेजरोलिया, लुकमन मेरिवाला, प्रवीण दुबे, टॉम करण, उमेश यादव, अक्षर पटेल, ललित यादव, मार्कस स्टोईनिस, रविचंद्रन अश्विन, सॅम बिलिंग्ज, विष्णू विनोद.
सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 वा.
मुंबई इंडियन्सला फलंदाजीची मुख्य चिंता
आजवर पाचवेळा आयपीएल विजेतेपद संपादन करणाऱया मुंबई इंडियन्सला यंदा बरेच झगडावे लागले असून फलंदाजांचा खराब फॉर्म ही त्यांची मुख्य चिंता राहिली आहे. स्टार सलामीवीर रोहित शर्मा व क्विन्टॉन डी कॉक यांना उत्तम प्रारंभाचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आलेले नाही आणि यामुळे मध्यफळीवर सातत्याने दडपण राहिले आहे. सौरभ तिवारी (45) व हार्दिक पंडय़ा (40) यांनी मात्र पंजाब किंग्सविरुद्ध मिळवलेल्या विजयात उत्तम फॉर्म दाखवून दिला होता. विस्फोटक फलंदाजीची क्षमता असलेला केरॉन पोलार्डही फिनिशरची भूमिका उत्तम रितीने पार पडत 7 चेंडूत 15 धावांवर नाबाद राहिला होता.
खराब फॉर्ममधील इशान किशनला आज पुन्हा संधी मिळणार का, हे देखील नाणेफेकीवेळीच स्पष्ट होऊ शकेल. गोलंदाजीत जसप्रित बुमराह 10 बळींसह सातत्य राखू शकलेला आहे. मुंबईचे फिरकीपटू मात्र बरेच निष्प्रभ होत राहिले आहेत. राहुल चहर व कृणाल पंडय़ा यांना आपली कामगिरी आणखी उंचावण्याची गरज आहे. लेगस्पिनर राहुल चहर 4 सामन्यात केवळ दोनच बळी घेऊ शकला तर कृणालच्या खात्यावरही अद्याप केवळ एकच बळी नोंद आहे.
कोट्स
हार्दिक पंडय़ाने प्रदीर्घ कालावधीपासून गोलंदाजी केलेली नाही आणि टी-20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर, आम्ही याबाबत सातत्याने भारतीय संघव्यवस्थापनाच्या संपर्कातही आहोत. सध्या 4 षटकांचा कोटा पूर्ण करणे सक्तीचे केले तर त्याच्यासाठी हा अतिरिक्त भार ठरु शकतो.
-मुंबई इंडियन्स प्रशिक्षक महेला जयवर्धने









