16 कोटीहून अधिक फोन्सची निर्यात : शाओमी ठरली सर्वात अव्वल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या स्मार्टफोन निर्यातीमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा 11 टक्के इतकी वाढ झाली आहे. वर्ष 2021 मध्ये 16.9 कोटी स्मार्टफोन्सची भारतातून अन्य देशांना निर्यात करण्यात आल्याची माहिती काउंटर पॉईंट रिसर्च यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
उलाढालीत उत्तम कामगिरी
या बाजाराची भारतातील उलाढाल 2021 मध्ये 38 अब्ज डॉलर्सच्यावर पोहोचली असल्याची माहिती संस्थेने दिली आहे, जी त्याच्या मागच्या वर्षाच्या तुलनेत 27 टक्के इतकी अधिक आहे. 2021 मध्ये 16.9 कोटी स्मार्टफोन्सची निर्यात करण्यात आली असून आधीच्या वर्षाच्या तुलनेत 11 टक्के इतकी निर्यातीत वाढ झालीय. पुरवठा संबंधीच्या अडचणीमुळे डिसेंबर तिमाहीत मागच्या वर्षाच्या तुलनेत 8 टक्के इतकी घट नोंदवली आहे. 2021 मध्ये भारतीय स्मार्टफोन बाजारांमध्ये ग्राहकांची मागणी सर्वाधिक राहिली असल्याचे दिसून आले आहे. मागच्या वषी कोरोनाची दुसरी लाट, त्याचप्रमाणे कच्च्या मालाच्या पुरवठय़ात व्यत्यय या साऱयाचा परिणाम झेलतही भारताने निर्यातीत केलेली वरील कामगिरी कौतुकास्पद म्हणायला हवी.
शाओमी निर्यातीत नंबर वन
या निर्यातीच्या वाटय़ामध्ये शाओमी या कंपनीने 24 टक्के इतक्या सर्वाधिक हिस्स्यासह अग्रस्थान प्राप्त केले आहे. यांच्या 30 हजार रुपयांपेक्षा अधिकच्या किमतीच्या मोबाईल्सना मागच्या वषी मोठय़ा प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद लाभल्याचे दिसले आहे. जो जवळजवळ 258 टक्के इतका विक्रमी दिसून आला आहे. एकूण निर्यातीच्या मागणीमध्ये सॅमसंगचा हिस्सा 18 टक्के इतका राहिला आहे. 20 हजार रुपये ते 45 हजार रुपये किमतीच्या यांच्या मोबाईल्सना 28 टक्के लोकांनी मागणी दर्शवली होती. तिकडे विवो कंपनीने निर्यातीमध्ये 15 टक्के इतका वाटा उचलला आहे. याव्यतिरीक्त अन्य कंपन्यांमध्ये ओप्पोने 10 टक्के इतका वाटा उचलला.
‘रियलमी’चा वरचष्मा
2021 मध्ये लोकप्रिय स्मार्टफोन बँडमध्ये ‘रियलमी’चा वरचष्मा राहिला आहे. त्यांच्या पाठोपाठ दुसऱया स्थानावर वन प्लस ही कंपनी राहिली आहे. सर्वाधिक वृद्धीच्या दृष्टीने पाहता ऍपलची कामगिरी नोंदणीय ठरली आहे. या कंपनीने 2021 मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत 108 टक्के इतकी वाढ दाखवली आहे.









