गोवा राज्यात रस्त्यावर अनेक बेवारशी गुरे आढळून येतात. तसेच रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्यामुळे अपघातही घडण्याचे प्रकार घडतात. यातूनही अनेक चालक जायबंदी झालेले आहेत तसेच दगावलेले आहेत. रस्ता अपघातात गुरे मृत्युमूखीही पडलेली आहेत. या गुरांना वाली कोण, असा साहजिकच सवाल उपस्थित होतो. सध्या भटक्या, बेवारस, अपघातग्रस्त गुरांसाठी गोव्यातील सिकेरी-मये येथील गोशाळा आश्रयस्थान बनलेली आहे.
दुग्ध उत्पादनातून शेतकऱयांचे जीवनमान उंचावणाऱया परंतु तेच उत्पन्न बंद झाल्यावर सोडून दिल्या जाणाऱया गोमातांना नेमका आधार भेटतो तरी कुणाचा, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. 33 कोटी देवांचा वास गायीमध्ये असतो, असे हिंदू संस्कृतीत मानले जाते. कुळधर्म-कुळाचाराला नैवेद्याचे वेगळे पान जिच्यासाठी वाढले जाते, ‘वसुबारस’ हा स्वतंत्र दिन ज्यासाठी साजरा केला जातो, अशा गायींचा सांभाळ करून पालनपोषण करीत असलेली सिकेरी-मये येथील गोशाळा सध्या भटक्या, बेवारस गुरांचे आश्रयस्थान आहे. या केंद्राला पणजी दूरदर्शनचे कार्यक्रम अधिकारी राजेंद्र फडते यांच्यासमवेत भेट देण्याचा योग आला. या गोशाळेला भेट देताच आत्मिक समाधान लाभते.
गोमंतक गोसेवक महासंघातर्फे सिकेरी-मये येथील गोशाळा चालविली जाते. या गोशाळेचे संस्थापक, चालक आहेत गोप्रेमी कमलाकांत सावळो तारी. तन-मन-धन अर्पून कमलाकांत तारी या गोशाळेची सेवा बजावत आहेत. गोव्यात ज्या गोहत्या होतात, त्या रोखण्यासाठी प्राणीमित्र अमृतसिंह व अन्य गोप्रेमी कार्यरत आहेत. ज्यावेळी चोडण येथे गो-हत्या होणार होती, त्यावेळी अमृतसिंह यांच्याबरोबर आपण होतो. योगगुरु रामदेवबाबा नेहमीच आपल्या भाषणात ‘गौमाता की जय’, अशी घोषणा देतात. त्यामुळे भारावूनच आपण गोसेवा करण्याचा निश्चय केल्याचे तारी म्हणाले. 2015 साली ही गोशाळा उभारण्यात आली. दोन गायींपासून सुरू झालेल्या या शाळेत आता 1650 हून अधिक गायी आहेत. त्यांचे संगोपन करण्याचे जे कमलाकांत तारी कार्य बजावितात, ते वाखाणण्याजोगे आहे. खऱया अर्थाने हे ईश्वरी कार्य म्हणावे लागेल.
कमलाकांत तारी यांचा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे पूर्वज गाईची सेवा बजावायचे मात्र ते पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभलेले नाही मात्र रामदेवबाबांच्या प्रभावामुळे आपणाला गायीची सेवा करण्याची संधी, प्रेरणा लाभली असल्याचे कमलाकांत तारी अभिमानाने सांगतात. गोशाळा सुरू करण्याचा ज्यावेळी विचार झाला, त्यावेळी कमलाकांत तारी जागा मिळविण्यासाठी भाटकारांना भेटले. त्यांच्याकडे ज्यावेळी याबद्दल भूमिका मांडली, त्यावेळी त्यांना ती पटली. एक ख्रिश्चन भाटकार निनॅद लुईस डिसोझा यांनी सुमारे 45 हजार चौ.मी. जागा गोशाळेसाठी उपलब्ध करून दिली. त्यामुळे गोव्यात ही मोठी शाळा असल्याचे कमलाकांत तारी म्हणाले. या शाळेच्या अजूनही साळ, माशेल, पाळी-सुर्ला येथे चार शाखा आहेत. येणाऱया काळात कार्यक्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाईल व भटक्या गुरांची सेवा केली जाईल, असे तारी म्हणाले. या गोशाळेत बहुतांश पांढऱया रंगाच्या गायी आहेत. दत्त शरणानंद स्वामीजी यांनी ज्यावेळी या गोशाळेला भेट दिली त्यावेळी त्यांनी पांढरी गाय गोवा राज्याची ओळख असल्याचे सांगितले. ओल्ड गोवा येथील शेतकी केंद्राचे प्रमुख एकनाथ चाकुरकर व त्यांच्या टीमने या गोशाळेला भेट देऊन पाहणी केली व संशोधन केले. केंद्रस्तरावर पांढऱया गायींचा ‘गोव्याची श्वेत कपिला’ म्हणून 53वा नंबर नोंदणीकृत आहे.
ही गोशाळा चालविताना अनेक आव्हाने आहेत. भटकी गुरे ज्यावेळी या गोशाळेत आणली जातात, बहुतांश या गुरांच्या पोटात सुमारे 45-50 किलोचे प्लास्टिक साठा असतो. प्लास्टिक साठा असल्यामुळे ती अशक्त बनतात. त्यांच्यात उठण्यासाठीही त्राण नसतो. गोशाळेचे डॉक्टर त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. काहीवेळा या गायींना वाचविण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरतात.
सरकार या गोशाळेला भरीव मदत देत आहे मात्र अजूनही मोठय़ा अपेक्षा सरकारकडून आहेत. गोवा सरकारकडून पूर्वीच्या योजनेत थोडा बदल करून भटक्या गुरांना ताब्यात घेण्यासाठी लागणारा खर्च तसेच प्रत्येकी गुरांसाठी लागणारा खाद्यखर्च पुरविला जातो. या गोशाळेसाठी साधनसामुग्री उपलब्ध होण्याच्यादृष्टीने अनेक गोप्रेमींना आवाहन केले होते. त्या आवाहनाला अनुसरून माई तिरोडकर या सेवाभावी महिलेने गुरांसाठी शेड उभारण्यासाठी भरीव आर्थिक साहाय्य केले. तसेच त्या दरमहा या शेडसाठी आर्थिक साहाय्य करीत असल्याची माहिती तारी यांनी दिली. रामदास भट या दात्यानेही कार्यालयासाठी व अन्य सामुग्रीसाठी भरीव असे साहाय्य केले. अनेक संस्थांनीही मदत केली आहे. त्यांची यादी फार मोठी असल्याचे तारी म्हणाले. दात्यांच्या तसेच गोवा सरकारच्या आधारावरच गोशाळा भव्य-दिव्य करण्याचा विचार असल्याचे तारी म्हणाले. उत्कृष्ट शेतकरी म्हणूनही तारी यांनी नावलौकिक कमाविलेला आहे. 2013 साली कृषक महोत्सव आयोजनातही त्यांचा सहभाग होता. या महोत्सवाच्या आयोजनाची प्रेरणा घेऊनच गोवा सरकारतर्फे तद्नंतर कृषी गौरव महोत्सव सुरू झाला. योगशिक्षक शिल्पा भोसले यांच्या प्रेरणेतून कमलाकांत तारी यांनी सुमारे 65 प्रकारचे भात-बियाणे या ठिकाणी पिकविले आहे. या गोशाळेत पीर्ण-बार्देश येथील डॉ. दत्तराज एम. नाईक पर्रीकर (निवृत्त उपसंचालक, पशुसंवर्धन संचालनालय) गेली दीड वर्षे गुरांची सेवा बजावत आहेत. अपघातग्रस्त, व्याधीग्रस्त गुरांवर उपचार करतात. त्यांचेही कार्य अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे. या गोशाळेत केवळ गायीचे संरक्षण नव्हे तर संस्कृती व संस्कार जोपासण्याच्यादृष्टीने, व्यक्ती घडविण्याच्यादृष्टीने विविध उपक्रम होतात.
– राजेश परब








