कोरोना काळातील सहकार्याबाबत अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांकडून वाहव्वा
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या दौऱयावर असलेले भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच अमेरिकेचे विदेशमंत्री अँटनी ब्लिंकेन यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेवेळी अमेरिकेनच्यावतीने ब्लिंकेन यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जगभरात कोरोना संसर्गाच्या काळात भारताने केलेल्या विशेष मदतीबाबत अमेरिकेने समाधान व्यक्त केले.
अमेरिकेत जो बायडेन यांचे सरकार नियुक्त झाल्यानंतर अमेरिकेच्या अधिकृत दौऱयावर असलेले जयशंकर हे देशाचे पहिले कॅबिनेट मंत्री आहेत. याचदरम्यान एस. जयशंकर आणि अँटनी ब्लिंकेन यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी अमेरिकन प्रशासनाकडून भारताचे आभार मानण्यात आले. ‘बायडेन सरकारच्या सुरवातीच्या काळात भारताने अमेरिकेला केलेली मदत आम्ही नेहमी स्मरणात ठेवू’ असे ब्लिंकेन म्हणाले. या भेटीमध्ये द्विपक्षीय महत्त्वाच्या मुद्दय़ांबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे विषय आणि कोरोनास्थितीबाबतही चर्चा झाली. तसेच इंडो-पॅसिफिक आणि भारत आणि अमेरिकेमधील आरोग्य, डिजिटल प्रणाली आणि अन्य क्षेत्रांमधील भागिदारीशी संबंधित मुद्यांविषयी जयशंकर यांनी अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू आणि बायडेन प्रशासनातील वरि÷ अधिकाऱयांसमवेत सल्लामसलत केली.
पत्रकारांशी संयुक्त संवाद
भेटीनंतर जयशंकर आणि ब्लिंकेन यांनी राज्य विभागात संयुक्तपणे पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही बऱयाच मुद्यांवर चर्चा केली. मला वाटते की गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील संबंध खूप मजबूत आहेत आणि मला विश्वास आहे की भविष्यातही असेच राहतील, असे जयशंकर म्हणाले. भारत आणि अमेरिका कोरोनाकाळात एकसाथ काम करत आहेत. या दरम्यान अनेक आव्हानांचा सामना आम्ही केल्याचे ब्लिंकेन यांनी नमूद केले.









