वृत्त संस्था/ ऍरहस (डेन्मार्क)
येथे सुरू असलेल्या थॉमस चषक पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताने क गटातील सलामीच्या लढतीत हॉलंडचा (नेदरलँड्स) 5-0 असा एकतर्फी पराभव केला.
क गटातील या पहिल्या लढतीमध्ये पुरूष एकेरीच्या सलामीच्या सामन्यात भारताच्या के श्रीकांतने हॉलंडच्या क्वेकेलचा 21-12, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. त्यानंतर पुरूष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या सात्विक साईराज रेनकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी हॉलंडच्या जिली व लिक्वे यांचा 21-19, 21-12 असा पराभव केला.
भारताने यावेळी हॉलंडवर 2-0 अशी आघाडी मिळविली होती. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात विश्व बॅडम्ंिांटन स्पर्धेतील कास्यपदक विजेत्या साई प्रणितने हॉलंडच्या मेसमनवर केवळ 27 मिनिटात 21-4, 21-12 अशी मात केली. दुसऱया दुहेरीच्या सामन्यात भारताच्या एम आर अर्जुन आणि धृव कपिला यांनी हॉलंडच्या बुजेक आणि व्हेसिंक याचा 21-12, 21-13 असा पराभव केला. शेवटच्या एकेरी सामन्यात भारताच्या समीर वर्माने हॉलंडच्या डुजेसचा 21-6, 21-11 असा पराभव करत हॉलंडचे आव्हान 5-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले.
महिलांच्या उबेर चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेतील झालेल्या लढतीत भारताने स्पेनवर 3-2 अशा फरकाने विजय मिळविला. भारतीय पुरूष संघाचा पुढील फेरीतील सामना मंगळवारी तेहीतीविरुद्ध होणार आहे. तर भारतीय महिला संघाचा पुढील सामना स्कॉटलंडविरुद्ध खेळविला जाणार आहे.









