प्रतिनिधी/ कराड
भारतीय जनता पक्षाचे जिह्यातील ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे (वय 100) यांचे शुक्रवारी 5 रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. शनिवारी 6 रोजी त्यांच्यावर करवडी (ता. कराड) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय अवजड रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी 26 सप्टेंबर रोजी त्यांची भेट घेऊन प्रकृतीचा विचारपूस केली होती. भाजप वाढवण्यासाठी राजाभाऊंनी आयुष्यभर निष्ठावान राहून प्रयत्न केले होते.
सातारा जिल्हय़ासह पश्चिम महाराष्ट्रात ज्या काळात निवडणुका काँग्रेस आणि काँग्र1sस बंडखोर यांच्यात व्हायच्या, त्या काळात राजाभाऊंनी भाजप वाढीसाठी स्वतःला झोकून दिले होते. अभ्यासू आणि आक्रमक नेते म्हणून ते जिह्याला परिचीत होते. अभ्यासू नगरसेवक म्हणूनही त्यांनी 1990 मधील कालवधी गाजवला होता. पालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले होते. जिह्यातील भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून देशपांडे यांचा उल्लेख होतो. अलिकडे ते राजकारणापासून अलिप्त आहेत मात्र पक्षामध्ये त्यांच्या शब्दाला वजन होते. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्याशी त्यांचा स्नेह होता. देशपांडे यांचे भाजपमधील योगदान लक्षात घेऊन भाजपचे अनेक नेते त्यांचा आदर्श मानत. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ज्येष्ठ नेते देशपांडे यांची घरी जाऊन भेट घेतली होती. त्या भेटीत देशपांडे यांचा 100 पेढय़ांचा हार घालून सत्कार केला होता. तो त्यांचा अंतिम कार्यक्रम ठरला.
राजाभाऊंच्या पार्थिवावर करवडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ चिरंजीव संजीव देशपांडे यांनी त्यांना अग्नग्नी दिला. तत्पूर्वी शनिवारी सकाळी पार्थिव शनिवार पेठ कराड येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, भाजपा प्रदेश प्रतिनिधी भरत पाटील, विनायक पावसकर यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ज्येष्ठ नेत्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले. त्यानंतर अंत्ययात्रा शहरातून काढण्यात आली. लोकशाही आघाडीचे नगरसेवक सौरभ पाटील यांच्यासह शहरातील विविध मान्यवरांनी या दरम्यान देशपांडे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली.
करवडी येथे त्यांच्या पार्थिवावर दुपारी एकच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी आमदार आनंदराव पाटील, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रदेश प्रतिनिधी अमित कुलकर्णी, युवा नेते धैर्यशील कदम, भाजपचे सांगली जिह्याचे माजी अध्यक्ष राजाराम गरुड, रामकृष्ण वेताळ, हरीष जोशी व मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सायंकाळी कराड येथील निवासस्थानी जाऊन देशपांडे कुटुंबियांचे सांत्वन केले. माजी खासदार गिरीश बापट आमदार चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीवरून देशपांडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.








