प्रतिनिधी/ बेळगाव
देशाच्या स्वातंत्र्यानंतर हिंदूराष्ट्र संकल्पना मांडण्यात आली. मात्र, या संकल्पनेविरोधात भूमिका घेण्यात आली. सामाजिक उन्नतीसाठी व्यक्तिगत स्वार्थाचा त्याग करून कोणताही भेदभाव न करता सर्वांच्या कल्याणासाठी कार्यरत असणारी राज्यव्यवस्था म्हणजेच हिंदूराष्ट्र होय. यामुळे भविष्यात हिंदूराष्ट्राची स्थापना होणारच आहे. त्यामुळे धर्मप्रेमींनी ही संकल्पना समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते ऋषिकेश गुर्जर यांनी केले.
अनसूरकर गल्ली येथील छत्रेवाडामध्ये जिल्हा हिंदूराष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना ऋषिकेश गुर्जर यांनी सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले गुरुजी यांनी हिंदूराष्ट्र संकल्पना मांडली असल्याचे सांगितले. तसेच सनातनचे कार्य या उद्देशाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आज हिंदूराष्ट्र या शब्दाचा उल्लेख केल्यास देशातील सेक्युलरवाद्यांच्या पोटात गोळा येतो. मात्र, काश्मीरमधील हिंदू निर्वासित झाले असताना याबाबत आवाज उठवत नाहीत. यामुळे देशातील सेक्युलरवादी ढोंगी असल्याचे गुर्जर यांनी सांगितले.
प्रारंभी हिंदू जनजागृती समितीचे धर्मप्रचारक काशीनाथ प्रभू, ऍड. अशोक पोतदार, ऍड. मोहन माविनकट्टी आणि ऋषिकेश गुर्जर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत आठवले यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे वाचन काशिनाथ प्रभू यांनी केले. ऍड. माविनकट्टी यांनी हिंदूधर्माचे महत्त्व तसेच राष्ट्र आणि धर्म यांची सद्यस्थिती याविषयी माहिती दिली. वासुदेव छत्रे गुरुजी यांनी वेदमंत्र पठण केले. सरिता मुगळी यांनी सूत्रसंचालन केले. समितीचे जिल्हाध्यक्ष सुधीर हेरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. रविवारीही अधिवेशन होणार आहे..









