देशभरात कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात आल्याच्या आनंदात नागरिक असताना आणि दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्याचा लाभ लोकांनी घेण्यास सुरुवात केली असतानाच केंद्र सरकार आणि सर्व राज्यांना नीती आयोगाने तिसऱया लाटेची भयसूचना दिली आहे. ती पूर्वीच्या लाटांपेक्षा भयंकर असेल आणि दर दिवसाला चार ते पाच लाख रुग्ण सापडतील असा गंभीर इशारा नीती आयोगाने दिला आहे. देशात लसीकरणाने आता कुठे गती घेतलेली असताना दिलेला हा इशारा भीती दाखवण्यासाठी नव्हे तर सावधगिरी बाळगली जावी यासाठी आहे. महाराष्ट्रात पुणे, नगर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिह्यांमध्ये अद्यापही दुसऱया लाटेचे परिणाम जाणवत आहेत. उत्तर कर्नाटक आणि गोवाही पूर्णतः सुटला असे झालेले नाही. सणासुदीच्या निमित्ताने या भागाला थोडीशी मोकळीक मिळालेली आहे. गणेशोत्सवात मुंबईतून कोकणात जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर लोक तयारी करत आहेत. अशावेळी आलेल्या या सूचनेने भीतीचे वातावरण निर्माण होणार आहे. पण तरीही हा गंभीर इशारा मिळणे आवश्यक होते. राज्यात घटत चाललेली रुग्ण संख्या आणि महाराष्ट्रा इतकाच प्रभावित असणाऱया केरळमध्ये जनजीवन स्थिरस्थावर होऊ लागल्याने सर्वत्रच थोडी उसंत मिळाल्याचे वातावरण आहे. मात्र रुग्णसंख्या वाढण्याचा धोका लक्षात घेता संयमाने आणि स्वतःच्या आयुष्याची काळजी घेऊन वावरणे आवश्यक आहे, हेच हा इशारा सांगतो आहे. नीती आयोग सांगतो त्यामागे अभ्यास असतो. गतवषी मार्च महिन्यात पहिला तडाखा बसला होता. सप्टेंबरमध्ये दुसरी लाट येईल असा अंदाज त्यांनी वर्तवला. प्रत्यक्षात ती एप्रिल-मे महिन्यात आली. मात्र, त्यावेळीही संसर्ग फार वेगाने होता. रोज चार लाखाहून अधिक रुग्ण देशात सापडत होते. एक जून रोजी देशात 18 लाख ग्रस्त होते आणि त्यातील 21.70 टक्के रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. 2.2 टक्के रुग्णांना आयसीयुत उपचार द्यावे लागले होते. याच आधारावर आधीच्या दोन लाटांचा विचार करून नीती आयोगाने जी भीती व्यक्त केली आहे ती गंभीर आहे. तिसऱया लाटेत सव्वा लाख व्हेंटिलेटर सह असणाऱया आयसीयू बेडची आवश्यकता लागेल. पाच लाख ऑक्सिजन बेडसह सात लाख नॉन आयसीयू बेडची तर दोन लाख आयसीयू बेडची गरज लागेल. याशिवाय देशभरात दहा लाख आयसोलेशन केअर बेड सज्ज ठेवले पाहिजेत, असे आयोगाने सांगितले आहे. एकूण रुग्णांपैकी 23 टक्के रुग्णांना रुग्णालयात भरती करावे लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. पहिल्या लाटेच्या आधारावर दुसऱया लाटेचा अंदाज बांधला गेला होता आणि तो तंतोतंत खरा ठरला. दुसऱया लाटेमध्ये 20 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते आणि त्यातील तीन टक्के लोकांना आयसीयूची गरज भासली होती. त्यादृष्टीने विचार केला तर तिसऱया लाटेमध्ये तीन टक्के अधिक रुग्णांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तो खूपच मोठा आहे. आधीची स्थिती लक्षात घेतली तर देशभरात सर्वत्रच आयसीयू बेडची कमतरता जाणवली होती. ऑक्सिजन पुरवठय़ाअभावी शेकडो लोकांचे मृत्यू झाले होते. अर्थात नंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी सोयिस्करपणे नाकारले. पण, वास्तवात फार मोठय़ा प्रमाणात लोकांचा ऑक्सिजनअभावी आणि ऑक्सिजन यंत्रणेतील गोंधळामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. यामागे अव्यवस्था हे कारण होतेच. मात्र, अशा प्रकारच्या अभूतपूर्व संकटाला आपण केवळ एक ते सव्वा वर्षाच्या अनुभवावर अचूकपणे सामोरे जाऊ शकत नाही हे यामागील खरे मर्म होते. जगभरातच उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांची संख्या फार मोठय़ा प्रमाणात होती आणि त्याच वेळेला अव्यवस्थेमुळे किंवा मनुष्यबळ, यंत्रसामग्री, आणि औषधांच्या कमतरतेमुळेही फार मोठय़ा प्रमाणावर मृत्यू आणि गंभीर इजेला लोकांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे नीती आयोग जी भयसूचना देतो आहे त्यामुळे घाबरून किंवा गोंधळून जाण्यापेक्षा आपापल्या राज्यात आणि त्यातही आपापल्या भागात व्यवस्था कशा प्रकारची आहे? याचा गांभीर्याने विचार करण्याची संधी म्हणून या सूचनेकडे पाहिले पाहिजे. नागरिकांच्यादृष्टीने दिलासादायक बाब म्हणजे, एक किंवा दोन डोस घेतलेल्यांची संख्या वाढत चालली आहे. हा एक मानसिक दिलासा सुद्धा आहे. डेल्टा प्लसचे आव्हान मोठे असल्याने दोन डोस नंतरही अनेकांना लागण होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे. तरीही स्वतःचा बचाव करणे हे प्रत्येकाच्या हातात आहे. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घेणे, मास्कचा वापर करत राहणे, सामाजिक अंतर बाळगणे आणि हात सातत्याने स्वच्छ करत राहणे या गोष्टी सवयीच्या बनवणे आवश्यक ठरणार आहे. पहिल्या आणि दुसऱया लाटेमध्ये मास्कचा वापर भीतीमुळे वाढला. तरीही समोरच्या व्यक्तीशी बोलताना मास्क खाली घ्यावा वगैरे चुकीच्या शिष्टाचाराचा परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर मोठय़ा प्रमाणावर झाल्याचे दिसून आले. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असणाऱया रुग्णांची संख्या भारतात जास्त असल्यामुळे अशा प्रकारचे चुकीचे शिष्टाचार अनेकांच्या बाबतीत जीवघेणे ठरले. हे लक्षात घेऊन मास्क खाली न घेणे हाच समोरच्याचा व स्वतःचाही सन्मान आहे अशा प्रकारची भावना लोकांमध्ये वाढीस लागणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासन, सामाजिक संस्था आणि व्यावसायिक कंपन्यांनी आपल्या जाहिरातीतून जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. सणासुदीच्या तोंडावर हा इशारा आल्याने त्याबाबत नाराजी प्रकट न करता या सूचनेचा उपयोग स्वतःचा व निकटवर्तीयांचा जीव वाचवण्यासाठी करण्याची आवश्यकता आहे. या सूचना देण्यामागे लोकांच्या जीविताचे रक्षण हा मुख्य हेतू असतो. गेल्या दीड वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था फारच बिघडली आहे. अर्थचक्र सुरू करणे हा मोठा दबावाचा भाग बनला आहे. अशा काळात अर्थचक्र ही सुरू राहिले पाहिजे आणि संसर्गाचे प्रमाणही कमी असले पाहिजे यासाठी दोन डोस घेतलेल्यांची संख्या वाढणे जितके गरजेचे तितकेच रस्त्यावर वावरणाऱया प्रत्येकाने स्वतःचे व इतरांचे रक्षण होईल असे वर्तन ठेवणेही आवश्यक आहे. अर्थातच कोरोनासह सुरक्षित जगणे हा ठराविकांच्या नव्हे तर सर्वांच्याच जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे.
Previous Articleबापा-वडिलांच्या असूयेच्या गोष्टी
Next Article देशाला मिळाला पहिला स्मॉग टॉवर
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








