लॉकडाऊन शिथिल झाला आहे. सार्वजनिक बागा पूर्वीइतक्मया नाहीत, पण थोडय़ा थोडय़ा फुलू लागल्या आहेत. व्यायाम करणारे पटू एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून चालणे, जॉगिंग वगैरे करीत आहेत. मात्र बागेत फक्त गुलाबी कारणास्तव येणारी किशोरवयीन मुलंमुली कोणतंही सोशल डिस्टंसिंग वगैरे पाळण्याच्या मनःस्थितीत नाहीतच.
परवा एक गंमत झाली. हरिदास आणि मी जॉगिंगच्या मैदानावर थोडंफार शरीर हलवून घामाघूम झाल्यावर एका कोपऱयात जाऊन विसाव्याला बसलो. समोरच्या बाकावर एक पंधरासोळा वर्षांचा हडकुळा मुलगा हातात मोबाईल धरून बसला होता. त्याला अगदी खेटून त्याच्याच वयाची एक मुलगी त्याच्या मोबाईलमध्ये बघत होती. दोघांच्या चेहऱयावरचे हर्षोत्फल भाव पाहिल्यावर दोघे अभ्यासाच्या नोट्स किंवा एखाद्या दैनिकाची इंटरनेट आवृत्ती किंवा विश्वकोशातला ज्ञानवर्धक मजकूर वाचत आहेत असं वेडय़ा माणसाला देखील वाटलं नसतं. मोबाईल बघत असताना दोघे इतके जवळ आलेले की त्यांच्या मधून मुंगीला देखील वाट मिळणं कठीण वाटावं. मुंगीला कठीण वाटेल की सोपं, आमचा मित्र जगजंपीला फक्त दुःख वाटलं. असूयेने तो फुसफुसला, “च्या… आपल्या वेळी असं काही नव्हतं. माझं वडील, एकदम बेक्कार.’’
“काय केलं तुझ्या वडिलांनी?’’ “काहीच केलं नाय. मी कॉलेजात गेलं त्याच वषी त्यांनी साहेबांशी भांडण केली आणि नोकरी सोडून घरी बसलं. मग काय मला पॉकेटमनी पण मिळाली नाही कधी. नायतर मी पण असं छान बसलं असतं.’’ “बसून काय फायदा? त्या वेळी मोबाईल फोन नव्हते. तू तिला काय दाखवणार होतास?’’ “मी तिला ना. सी. फडके नायतर काकोडकराच्या कादंबरीतलं छान वर्णन दाखवलं असतं की.’’
“ते तसं झालं नाही म्हणून आता हळहळण्यात काय अर्थ आहे? तुझ्या वडिलांची त्याचवेळी नेमकी नोकरी गेली आणि त्यामुळे नकळत पर्मनंट नोकरी-स्थिर आयुष्याचं महत्त्व तुझ्या मनात बिंबलं. आयुष्यात अनेकदा साहेबांनी तुझी बिनपाण्याने केली असेल. तरी तू कान पाडून नोकरी करीत राहिलास. त्यामुळे तुझ्या मुलांची शिक्षणे नीट पार पडली. मुलं मार्गाला लागली, आपण आदर्श बाप बनलो, याचा तुला आनंद नाही वाटत? जग्गा, समोरची बारकी पोरं मजा करताहेत, आपल्या वेळी ती नव्हती, कबूल. पण म्हणून त्यांच्या विषयी असूया बाळगणं हा वेडेपणा आहे. सोड हा वेडेपणा.’’
जग्गाला माझं बोलणं किती पटलं, मला कळालं नाही. पण त्याने माझा प्रतिवाद केला नाही.








