भंडारी समाजावरील टीकेला आपचे प्रत्युत्तर
प्रतिनिधी /पणजी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसीय दौऱयात गोमंतक भंडारी समाज कार्यालयास भेट देऊन बैठक घेतल्यामुळे बिथरलेल्या भाजपने भंडारी समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याचा आप नेते अमित पालेकर, राजदीप नाईक आणि नोनू नाईक यांनी निषेध केला आहे.
भाजपने आजपर्यंत भंडारी समाजाचा वापर केवळ राजकीय स्वार्थासाठीच केला आहे. याऊलट केजरीवाल यांनी आपल्या गोवा दौऱयात या समाजाच्या कार्यालयास भेट देण्याचे सौजन्य दाखवत त्यांच्या समस्या तक्रारी ऐकून घेतल्या. ही राजकीय बैठक नव्हती. भाजप मात्र ’फूट पाडा आणि राज्य करा’, असे डावपेच करत आहे. असा आरोप पालेकर यांनी केला.
बिथरलेल्या भाजप नेत्यांकडून आपवर टीका
सध्या सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे व्यासपीठ म्हणून ’आप’कडे पाहिले जाते. म्हणुनच भाजप नेते बिथरले आहेत. त्या भीतीपोटीच ’आप’ कडून करण्यात येणाऱया प्रत्येक गोष्टीवर भाजप नेते टीका करत आहेत. पण, भंडारी समाज सुशिक्षित आहे, त्याला सत्याची जाणीव आहे. त्यामुळे भाजपने येथे जातीचे राजकारण थांबवावे, असे पालयेकर पुढे म्हणाले.
सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीला घाबरला आहे. त्यामुळेच दोन ज्ये÷ नेते पत्रकार परिषद घेत आहेत. भंडारी समाज अनेक वर्षांपासून अनेक गोष्टींची मागणी करत आहे, मात्र सरकारने त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे निवडणुका जवळ येताच भंडारी समाजाची भाजपला आठवण होते, हे हास्यास्पदच नव्हे तर दुर्दैवीही आहे, अशी टीका बेतकी-खांडोळाचे माजी पंच सदस्य नोनू नाईक यांनी केली.
विश्वास सतरकर यांचा ओबीसी आयुक्तपदाचा कालावधी संपल्यानंतर सरकारने नवीन आयुक्त नेमण्याची तसदी घेतली नाही. त्यासाठी त्यांना 8 महिने लागले. 2019-2020 या वर्षातील अनेक शिष्यवृत्ती प्रलंबित आहेत. अशा असंख्य प्रश्नांकडे भाजपचे लक्ष जात नाही, पण केजरीवाल यांनी भंडारी समाजाची भेट घेतली तेव्हाच त्यांना भंडारी समाजाची आठवण झाली, असे नाईक पुढे म्हणाले.
भाजपकडून भंडारी समाजाचा वापर : राजदीप नाईक
भाजपने भंडारी समाजाचा वापर त्यांच्या फायद्यासाठी केला. आजपर्यंत रवी नाईक यांच्याशिवाय भंडारी समाजातील कोणालाही राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही. भाजपला फक्त फूट पाडा आणि राज्य करा ही खेळी माहीत आहे अशी टिका आप गोवा प्रचार समितीचे उपाध्यक्ष राजदीप नाईक यांनी केली.
नोनू नाईक ’आप’मध्ये दाखल
दरम्यान, ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष आणि बेतकी-खांडोळाचे माजी पंचसदस्य नोनू नाईक यांनी ’आप’मध्ये प्रवेश केला. नोनू नाईक हे माशेल येथील पत्रकार संघाचे संस्थापक सचिव आहेत. 1982-1992 पर्यंत त्यांनी ग्रामीण विकास संस्थेच्या योजनेअंतर्गत विविध भागात शिक्षक म्हणून देखील काम केले आहे. नवनिर्माण अभियान फोंडा तालुका प्रमुख म्हणून बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियानाचा ते एक भाग होते. ते बेतकी खांडोळा ग्राहक सहकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष आणि अखिल गोवा अंगणवाडी कर्मचारी संघाचे माजी सचिव होते.
आप हा गोमंतकीयांसाठी पर्याय आहे. केजरीवाल सरकारने दिल्लीत केलेल्या विकास कामामुळे आपण प्रभावित झालो. तेच प्रामाणिक प्रशासन गोव्यातही पहावयाचे आहे. म्हणून आपण आपमध्ये सामील झालो, असे नाईक म्हणाले.









