स्कोपा अमेरिका फुटबॉल -कोलंबिया-व्हेनेझुएला लढत गोलशून्य बरोबरीत
वृत्तसंस्था / साओ पॉलो
कोपा अमेरिका स्पर्धेतील सामन्यासाठी यजमान ब्राझीलने स्टार्टिंग लाईनअपमध्ये निम्मा संघ बदलला असला तरी पेरूवर 4-0 असा एकतर्फी विजय मिळविला. या सामन्यात नेमारने सर्वाधिक गोल नोंदवणाऱया खेळाडूंत रोनाल्डोला मागे टाकत दुसरे स्थान मिळविले आहे. अन्य एका सामन्यात कोलंबिया व व्हेनेझुएला यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली.
ब्राझीलचा हा सलग नववा विजय असून या स्पर्धेचे जेतेपद स्वतःकडेच राखण्यासाठी तेच फेव्हरिट असल्याचे स्पष्ट होते. डिफेंडर ऍलेक्स सँड्रो, नेमार, मिडफिल्डर एव्हर्टन रिबेरो व स्ट्रायकर रिचार्लीसन यांनी ब्राझीलचे गोल नोंदवले. नेमारचा हा 68 वा गोल असून त्याने रोनाल्डोला मागे टाकले आहे. महान फुटबॉलपटू पेले यांनी 92 सामन्यात 77 गोल नोंदवले असून त्यांच्यानंतर नेमार दुसऱया क्रमांकावर आहे. या विजयानंतर गट ब मध्ये ब्राझीलने 6 गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. कोलंबिया 2 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. ब्राझील संघाचे प्रशिक्षक टिटे यांनी सांगितल्याप्रमाणे ब्राझील संघ पुढील वर्षी कतारमध्ये होणाऱया विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी या स्पर्धेचा उपयोग करीत आहे. पहिल्या सामन्यात व्हेनेझुएलावर ब्राझीलने 3-0 असा विजय मिळविला होता. त्या सामन्यात सहा खेळाडूंना स्टार्टिंग लाईनअपमध्ये घेतले नव्हते, त्यांना यावेळी संधी देण्यात आली होती.
ब्राझीलने 12 व्या मिनिटाला पहिले यश मिळविले. गॅब्रिएल बार्बोसाने पुरविलेल्या क्रॉसवर सँड्रोने हा गोल नोंदवला. मात्र स्थान देण्यात आलेले नवे खेळाडू प्रशिक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे खेळ करू शकले नाहीत. एव्हर्टन रिबेरो व रिचार्लीसन मैदानात उतरल्यानंतर उत्तरार्धात ब्राझीलच्या खेळात सुधारणा झाली. 68 व्या मिनिटाला पेरूच्या बॉक्समधून नेमारला चेंडू मिळाला. त्याने गोलरक्षकाला हुलकावणी देत लो क्रॉस फटका मारत संघाचा दुसरा गोल नोंदवला. पेरूने नंतर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पण ब्राझीलनेच 89 व्या मिनिटाला आणखी एक गोल नोंदवला. रिबेरोने अगदी जवळून हा गोल केला. पेरूचा गोलरक्षक पेड्रो गॅलेसेने वाढीव वेळेत दोन अप्रतिम बचाव केले. पण रिचार्लीसनचा फटका मात्र तो अडवू शकला नाही.
कोलंबिया-व्हेनेझुएला लढत अनिर्णीत
गोवानिया येथे झालेल्या सामन्यात कमकुवत झालेल्या व्हेनेझुएलाने कोलंबियाला गोलशून्य बरोबरीत रोखण्यात यश मिळविले. आजवर एकदाही व्हेनेझुएलाने कोपा अमेरिका स्पर्धा जिंकलेली नसून यावेळीही त्यांना आगेकूच करण्याच्या आशा कमी आहेत. स्पर्धा सुरू होण्याआधीच्या त्यांच्या आठ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना सेल्फ आयसोलेट व्हावे लागले होते. या सामन्यात तसेच आधीच्या सामन्यातही व्हेनेझुएलाने फक्त एकदाच गोलच्या दिशेने फटका मारला होता. कोलंबियाने मात्र असे 17 फटके मारले होते. त्यांचा गोलरक्षक वील्कर फरिनेझने शानदार गोलरक्षण करीत कोलंबियाचे अनेक प्रयत्न फोल ठरविले. 90 व्या मिनिटाला कोलंबियाच्या मिग्वेल बोर्जाने गोल नोंदवला होता. पण रेफरीनी तो ऑफसाईड ठरविला. त्यानंतर लुईस डायझला लाल कार्ड दाखविल्याने कोलंबियाला दहा खेळाडूंनिशी खेळावे लागले होते. कोलंबियाने पहिल्या सामन्यात इक्वेडोरवर 1-0 असा विजय मिळविला होता. त्यांनी दोन सामन्यात चार गुण घेत गट ब मध्ये अग्रस्थान घेतले असून व्हेनेझुएलाने दोन सामन्यात एक गुण मिळविला आहे. मात्र बाद फेरी गाठण्याच्या त्यांना अजूनही आशा आहेत.









