प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील बोरज येथील नाल्यात घातक रसायन ओतण्याची पुनरावृत्ती झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सोमवारी अज्ञात वाहनचालकाने नाल्यात घातक रसायन ओतून लागलीच पलायन केले. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालय गाठत संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे निवेदन तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना दिले.
बोरज गावालगत वाहता नाला आहे. याचठिकाणी असंख्य वाहनेही थांबतात. सोमवारी अज्ञात वाहनचालकाने याच नाल्यात घातक रसायन सोडले. हे रसायन गावाला पाणीपुरवठा करणाऱया घोसाळकरवाडीतील विहिरीसह अन्य वाडय़ांतील विहिरीमध्ये मिसळून पाणी दूषित झाले आहे. विहिरीतील माशांसह अन्य जलचर प्राणी मृत्यूमुखी पडल्याने ग्रामस्थांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालय गाठत सर्व परिस्थिती तहसीलदार घोरपडे यांच्या निदर्शनास आणून दिली. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
दोन वर्षापूर्वी याच नाल्यात घातक रसायन सोडण्यात आले होते. त्यावेळी पाणी दूषित झाल्याने 40 हून अधिक ग्रामस्थांना बाधा झाली होती. यामध्ये एकाचा हकनाक बळीदेखील गेला होता. घातक रसायन ओतणाऱया त्या वाहनाचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातही अज्ञात वाहनचालकाने याच नाल्यात घातक रसायन ओतले होते. याचाही सुगावा अद्याप लागलेला नाही. यापाठोपाठ सोमवारी 27 जुलै रोजी पुन्हा या नाल्यात घातक रसायन ओतण्याची पुनरावृत्ती झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित वाहनचालकावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.









