कोरोना बळींची संख्या 57 वर, रत्नागिरीतील दोघांचा समावेश 3 नवे रूग्ण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोनाच्या कहर वाढतच असून गेल्या 24 तासात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये रत्नागिरीतील 2 तर संगमेश्वर व चिपळूणमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान, सोमवार सायंकाळपासूनच्या 24 तासांत 43 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या 1661 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत जिल्हय़ातील अकराशे रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील मुरडव येथील 45 वर्षीय रुग्णाचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील हा कोरोनाचा सातवा बळी आहे.
रत्नागिरी तालुक्यातील बळींची संख्या 14
रत्नागिरी पेठकिल्ला येथील 40 वर्षीय कोरोना रुग्णाचा मंगळवारी उपचारा दरम्यान कोव्हीड रूग्णलयात मृत्यू झाला. त्याचबरोबर मिरकरवाडा येथील 40 वर्षीय महिलेचाही जिल्हा कोव्हीड रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बळींची संख्या 14 झाली आहे.
चिपळूण तालुक्यातील कालुस्ते येथील 80 वर्षीय कोरोना उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. चिपळुण तालुक्यातील हा 10 वा कोरोना बळी आहे. या चौघांच्या मत्=यूमुळे जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या 57 झाली आहे.
48 जण कोरोनामुक्त
सोमवारी 48 रुग्णांना बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1102 झाली आहे. बरे झालेल्यांमध्ये जिल्हा रुग्णालय 3, दापोली 3, कामथे 3, समाजकल्याण रत्नागिरी 7, घरडा खेड 19, पेंढांबे चिपळूण येथील 13 जणांचा समावेश आहे.
416 अहवाल प्रलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 16 हजार 815 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 16 हजार 399 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1661 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 14 हजार 726 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 416 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
रत्नागिरीत महिला पोलीस पॉझिटिव्ह
सोमवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरी शहर पोलीस स्थानकातातील आणखी एक महिला पोलीस कर्मचाऱयाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका आठवडय़ात 3 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. गेल्या आठवडय़ात शहर पोलीस स्थानकातील काही कर्मचारी यांचे स्वब घेण्यात आले होते. यावेळी एका महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते, त्यानंतर रविवारी रात्री एका पुरुष कर्मचारी याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असताना सोमवारी आणखीन एका महिला कर्मचाऱयाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने जिल्हा पोलीस अलर्ट झाले आहे.









