वृत्तसंस्था/ पुणे
टाटा पुरस्कृत 2022 महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या जोडीने दुहेरीची उपांत्यफेरी गाठली आहे.
बोपण्णा आणि रामकुमार यांनी गुरुवारी दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रियाचा इरलेर आणि झेकचा व्हेसेली यांचा 7-6 (7-3), 7-6 (7-4) असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. बोपण्णा आणि रामकुमार हे एटीपी टूरवरील दुसऱया स्पर्धेत एकत्रित खेळत आहेत. दुहेरीच्या दुसऱया एका सामन्यात फ्रान्सच्या सॅडिओ डोंबिया आणि रिबॉल यांनी मुसेटी व फेड्रिको गेवो यांचा 4-6, 6-3, 10-2 असा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. भारताच्या एन. श्रीराम बालाजी व विष्णुवर्धन या जोडीनेही दुहेरीची उपांत्यफेरी गाठली आहे. दुखापतीमुळे त्यांच्या प्रतिस्पर्धी जोडीने स्पर्धेतून माघार घेतल्याने बालाजी आणि विष्णुवर्धन यांना पुढे चाल मिळाली.
या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या सामन्यात स्वीडनचा इमेरने रशियाच्या कॅरेटसेव्हचा 6-2, 7-6 (7-3) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. हा सामना दीड तास चालला होता. दुसऱया एका सामन्यात इटलीच्या टेव्हेगिलाने भारताच्या युकी भांब्रीचा 6-3, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले आहे.









