वृत्तसंस्था/ बेंगळूर
आठव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेतील गुरुवारी येथे झालेल्या सामन्यात दीपक हुडाच्या शानदार कामगिरीच्या जोरावर जयपूर पिंक पँथर्सने दबंग दिल्लीचा 36-30 अशा 6 गुणांच्या फरकाने पराभव केला. त्याचप्रमाणे दुसऱया एका सामन्यात तामिळ थलैवाजने तेलगू टायटन्सवर 43-25 अशी मात केली.
जयपूर आणि दिल्ली दबंग यांच्यातील सामना चुरशीचा झाला. जयपूर संघातील दीपक हुडाने सुपर-10 गुणांसह एकूण 12 गुण मिळविले. दीपक हुडाला त्याच्या संघातील बचावफळीकडून चांगली साथ मिळाली. अनुभवी कबड्डीपटू मनजित चिल्लर, जीवाकुमार आणि जोगिंदर नरवाल यांना या सामन्यात शेवटपर्यंत सूर मिळाला नाही. संपूर्ण सामन्यामध्ये या तीन कबड्डीपटूंनी केवळ 7 टॅकल गुण मिळविले. दबंग दिल्लीच्या विजयने 16 गुण नोंदविले. मध्यंतरापर्यंत जयपूर संघाने दबंग दिल्लीवर 21-15 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात नवीनकुमारला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीच्या विजयने सुपर-10 गुण मिळविले. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना जयपूर संघाने दिल्लीवर 7 गुणांची आघाडी घेतली होती. शेवटच्या पाच मिनिटांमध्ये दीपक हुडाने दिल्लीचे सर्व गडी बाद करून सुपर-10 गुण मिळविल्याने जयपूर पिंक पँथर्सने हा सामना 6 गुणांनी जिंकला. या स्पर्धेतील गुरुवारच्या दुसऱया सामन्यात तामिळ थलैवाजने तेलगू टायटन्सचा 43-25 असा दणदणीत पराभव केला. तामिळ संघातील सागरने 9 टॅकल गुण मिळविले. साहिल गुलियाने 4 गुण तर अजिंक्मय पवारने 10 तसेच मनजितने 9 गुण घेतले. तेलगू टायटन्स संघाने या स्पर्धेत आतापर्यंत एकमेव सामना जिंकला आहे. तामिळ संघाचा हा दुसरा विजय आहे. मध्यंतरापर्यंत तामिळ संघाने तेलगू टायटन्सवर 22-10 अशा 12 गुणांची आघाडी मिळविली होती. मनजितने सुपर रेडमध्ये 3 गुण घेतले. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना तेलगू टायटन्सचे दुसऱयांदा सर्व गडी बाद झाल्याने तामिळ संघाने 20 गुणांची आघाडी मिळविली होती. शेवटच्या काही मिनिटात अजिंक्मय पवारने सुपर-10 गुण तसेच सागरने 9 टॅकल गुण मिळवित तेलगू टायटन्सचे आव्हान संपुष्टात आणले









