प्रतिनिधी/ बेळगाव
देशातील निळे शहर अशी ओळख असणाऱया राजस्थानमधील जोधपूर शहराला लवकरच बेळगावमधून थेट विमानसेवा सुरू होणार आहे. घोडावत ग्रुपची स्टार एअर कंपनी या शहराला सेवा सुरू करणार आहे. ही विमानफेरी उडानअंतर्गत मंजूर करण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाकडे कंपनीने या फेरीसाठी प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असून, लवकरच या मार्गावर विमानफेरी सुरू केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
उडान 3 अंतर्गत सर्वसामान्यांना विमान प्रवास करता यावा यासाठी कमी दरात तिकिटाचे दर ठेवण्यात आले आहेत. विशेषत: देशातील टू टायर व थ्री टायर शहरांना या योजनेतून जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या योजनेतून बेळगावला अनेक मार्गांवर विमानफेऱया सुरू झाल्या आहेत. सर्वाधिक मार्ग हे स्टार एअरला मंजूर झाले होते.
जोधपूर येथील विमानतळाचे संचालक जी. के. खरे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार स्टार एअरने या विमान फेरीसाठी प्रस्ताव पाठविला होता. बेळगाव व अहमदाबाद या दोन शहरांना जोधपूर येथून विमानसेवेसाठी प्रस्ताव पाठविला होता. हा प्रस्ताव मुख्यालयाकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राजस्थानला जाणाऱया प्रवाशांची होणार सोय
बेळगाव तसेच आसपासच्या जिल्हय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात मारवाडी समाज व्यवसायानिमित्त स्थायिक आहेत. त्यामुळे या नागरिकांना आपल्या गावी ये-जा करण्यासाठी ही विमानफेरी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. स्टार एअरचे 50 आसन क्षमता असणारे विमान या मार्गावर धावणार आहे. त्यामुळे ही विमानफेरी केव्हा सुरू होणार याची उत्सुकता प्रवाशांना लागली आहे.









