रात्री 8 पासूनच कर्फ्यू, पोलीस अधिकारी लागले कामाला
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारी थोपविण्यासाठी राज्य सरकारने रात्रीचा कर्फ्यु वाढविला आहे. सोमवारी 29 जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून रात्री 8 पासूनच शहरातील दुकाने बंद करण्यात आली. यासाठी पोलीस दल पूर्णपणे कामाला लागले आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता. सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. ही परीक्षा संपल्यानंतर 5 जुलैपासून दर रविवारी दिवसाही कर्फ्यु असणार आहे. यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार रात्री 9 पासून कर्फ्युची अंमलबजावणी होत होती. आता रोज रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत कर्फ्यु असणार आहे. कोरोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी अनावश्यकपणे फिरणाऱया नागरिकांवर बंदी आणण्यासाठी हा कर्फ्यु असणार आहे. सरकारी कर्मचाऱयांना दर शनिवारी व रविवारी सुटी देवून केवळ पाच दिवस कार्यालये उघडी ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. रात्री 8 पासूनच्या कर्फ्युला सोमवारपासून सुरुवात झाली.
नेहमी वर्दळ असणाऱया गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, संयुक्त महाराष्ट्र चौक परिसरात रात्री 8 पासूनच शुकशुकाट होता. पोलिसांची वाहने कर्फ्युची अंमलबजावणी करण्यासाठी फिरत होती. अधिकारीही फेरफटका मारताना दिसत होते. पुढील एक महिन्यापर्यंत हा नवा नियम लागू असणार आहे. कोरोना महामारी थोपविण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे.









